पुढील ३ ते ४ महिन्यांत टाटा कॉलनीलगतच्या स्मशानभूमीत गॅसदाहिनीची सुविधा
- by Adarsh Maharashtra
- Jul 23, 2020
- 820 views
मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले)मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनी नजीकच्या संयुक्त स्मशानभूमीत गॅसदाहीनी बसवण्याच्या नागरिकांच्या मागणीला यश येत असल्याचे दिसत असून पुढील ३ ते ४ महिन्यांत ही गॅसदाहीनी कार्यान्वित होणार असल्याचे पालिकेच्या टी वार्डचे आरोग्य अधिकारी प्रकाश गाढ यांनी आज सांगितले. सध्या गॅसदाहिनी, विद्युतदाहिनीची सुविधा मुलुंड मध्ये उपलब्ध नसल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना भांडूप किंवा विक्रोळी येथील स्मशानभूमीचा आसरा घ्यावा लागत असून तेथे मृतदेह जाळण्यासाठी असलेल्या रांगेत ४ ते ५ तास ताटकळत राहावे लागत आहे.
टाटा कॉलनी लगतच्या संयुक्त स्मशानभूमीत गॅसदाहिनी बसवण्यासोबतच स्मशानभूमीतील इतर दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव पालिकेच्या टी वार्डच्या आरोग्य खात्याने फेब्रुवारी महिन्यात बनवून पुढील कारवाईसाठी पालिका प्रशासनाकडे पाठवला होता. त्यास मान्यता मिळाल्याने हा प्रस्ताव पालिकेच्या वरळी येथील कार्यालयात एस्टिमेशनसाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच या कार्यालयाकडून ह्या कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक आल्यानंतर ताबडतोब ते पालिकेच्या वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल व तेथून मंजुरी मिळताच गॅसदाहिनीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीची ऑर्डर ही यंत्रसामग्री बनवणाऱ्या कंपनीला देण्यात येईल. या मशिनरी येताच टाटा कॉलनीलगतच्या स्मशानभूमीत गॅसदाहिनी साठी आधीच बांधून ठेवलेल्या जागेत यंत्रसामुग्री बसवायच्या कामाला सुरुवात होईल. त्याचवेळी या स्मशान भूमीतील इतर दुरुस्तीकामांना देखील सुरुवात करण्यात येवून ही कामे पूर्ण करण्यात येतील. त्याआधी येत्या काही दिवसांत या स्मशान भूमीतील गॅसदाहिनी बसवायच्या जागेचे स्ट्रक्चरल ऑडीत केले जाईल. त्यामुळे इतर काही अडचणी नाही आल्या तर पुढील ३ ते ४ महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होवून टाटा कॉलनी लगतच्या संयुक्त स्मशानभूमीत गॅसदाहिनी कार्यान्वित होवू शकेल असे टी वार्डचे स्मशानभूमीची जबाबदारी असलेले आरोग्य अधिकारी प्रकाश गाढ यांनी सांगितले.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम