विद्यार्थ्याने शाळेत जाऊन स्वतःला पेटवले

वडिलांनी बाईक न दिल्याने पेटवले

नवी मुंबई : वडिलांनी शाळेत जाण्यासाठी मोटरसायकल न दिल्यानं इयत्ता ११ वीच्या सायन्स शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनं स्वत:ला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कळंबोलीतील नवीन सुधागड हायस्कूलमध्ये जाऊन या विद्यार्थ्यांन स्वत:ला पेटवून घेतलं. शिवम दीपक यादव (१७) असं स्वतःला जाळून घेतलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे.

या घटनेत शिवम ९० टक्के भाजला असून त्याला पुढील उपचारासाठी ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शिवमचे वडील दीपक यादव हे मुंबई पोलीस दलात नागपाडा मोटर परिवहन विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत. दीपक यादव हे कळंबोलीतील अमरदीप सोसायटीत कुटुंबासह राहतात. त्यांचा मुलगा शिवम हा कळंबोलीतील न्यू सुधागड हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावी सायन्सचे शिक्षण घेत आहे.

शिवम शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे न्यू सुधागड हायस्कूलमध्ये जाण्यासाठी तयार झाल्यानंतर त्यानं आपल्या वडिलांकडं शाळेत जाण्यासाठी मोटरसायकलची मागणी केली मात्र दीपक यादव यांनी त्याला मोटरसायकल देण्यास नकार दिला. त्यानंतर शिवम रागाच्या भरात न्यू सुधागड हायस्कूलमध्ये गेला. त्यानं शाळेतील दुसऱ्या मजल्यावरील शौचालयात जाऊन स्वतःला पेटवून घेतलं.

घटनेची माहिती मिळताच शाळेतील शिक्षकांनी त्याला गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र या घटनेत शिवम ९० टक्के भाजला गेल्यानं त्याला पुढील उपचारासाठी ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी दिली.

संबंधित पोस्ट