भूमिगत पर्जन्यजल वाहिन्यांच्या सफाईसाठी पहिल्यांदाच 'मिनी रोबो'; वाहिन्यांमध्ये विषारी वायू असणाच्या शक्यतेमुळे अत्याधुनिक यंत्राद्वारे होणार सफाई

ब्रिटिश कालीन भूमिगत पर्जन्यजल वाहिन्यांची प्रथमच होणार अंतर्गत सफाई

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात पडणा-या पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलदगतीने व्हावा, यासाठी विविध प्रकारच्या पर्जन्यजल वाहिन्या आहेत. यापैकी शहर भागात काही ठिकाणी कमानी पद्धतीचे बांधकाम (Arch Drain)असलेल्या ब्रिटिश कालीन भूमिगत पर्जन्यजल वाहिन्या आहेत. या वाहिन्यांची लांबी ही सुमारे ३६ किलोमीटर आहे. तसेच भूमिगत 'पाईप' असणा-या वाहन्यांची लांबी ही सुमारे ३४ किलोमीटर आहे. यानुसार शहर भागातील सुमारे ७० किलोमीटर लांबीच्या भूमिगत वाहिन्यांचा असणारा मर्यादित आकार आणि त्यामध्ये विषारी वायू असण्याची शक्यता लक्षात घेऊन आजवर या वाहिन्यांच्या 'मॅनहोल' मध्ये 'सक्शन पाईप' टाकून शक्य ती साफसफाई केली जात असे.मात्र, या वर्षी पासून या वाहिन्यांच्या आत जाऊन साफसफाई करु शकेल, असे अत्याधुनिक स्वरुपाचे व रिमोट कंट्रोलच्या मदतीने नियंत्रित करता येईल असे 'मिनी रोबो' हे यंत्र उपयोगात आणले जाणार आहे. ज्यामुळे वरिल भूमिगत पर्जन्यजल वाहिन्यांची पहिल्यांदाच अंतर्गत साफसफाई होणार आहे, अशी माहिती पर्जन्यजल वाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता श्री. श्रीकांत कावळे यांनी दिली आहे.


'मिनी रोबो'द्वारे भूमिगत वाहिन्यांची सफाई पावसाळापूर्व व पावसाळ्यानंतर अशा दोन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. या दोन्ही टप्प्यांमध्ये भूमिगत वाहिन्यांची सफाई करण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. हा प्राधान्यक्रम ठरविताना गेल्या काही वर्षात पावसाळ्याच्या काळात पाण्याचा निचरा होण्यास लागलेल्या कालावधीचा अभ्यास करुन निर्धारित करण्यात आला आहे. यानुसार पाण्याचा निचरा अधिक कालावधी लागलेल्या ठिकाणांशी संबंधित पर्जन्यजल वाहिन्या या 'प्राधान्यक्रम १' मध्ये आहेत. तर उर्वरित वाहिन्यांचा समावेश हा पाणी निचरा कालावधीच्या उतरत्या भाजणीनुसार अन्य प्राधान्यक्रम गटांमध्ये करण्यात आला आहे.



पावसाळापूर्व साफसफाईच्या 'प्राध्यान्यक्रम १' अंतर्गत समावेश असलेल्या भूमिगत वाहिन्यांमध्ये '' विभागातील शहीद भगतसिंह मार्ग, 'बी' विभागातील मियां अहमद छोटाणी मार्ग, 'सी' विभागातील किका रस्ता, 'डी' विभागातील'बॉडीगार्ड लेन', '' विभागातील जहांगिर बोमन बेहराम मार्ग (बेलासिस रोड), 'एफ दक्षिण' विभागातील मडके बुवा चौक ते श्रावण यशवंत चौक, 'एफ उत्तर' विभागातील षण्मुखानंद सभागृह ते बंगाली-पुरा, 'जी दक्षिण' विभागातील फीतवाला लेन व सेनापती बापट मार्गाच्या जंक्शन पासून मडूरकर जंक्शन पर्यंत आणि 'जी उत्तर' विभागातील महात्मा गांधी मार्ग या रस्त्यांच्या खाली असणा-या पर्जन्यजल वाहिन्यांचा समावेश आहे. 'प्राधान्यक्रम १' अंतर्गत असलेल्या भूमिगत वाहिन्यांची साफसफाई झाल्यानंतर इतर वाहिन्यांची साफसफाई ही निर्धारित प्राधान्यक्रमानुसार करण्यात येणार आहे.


बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पर्जन्यजल वाहिन्यांची सफाई व भूमिगत वाहिन्यांच्या अंतर्गत सफाईसाठी पहिल्यांदाच उपयोगात आणला जाणारा 'मिनी रोबो' याबाबत महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे आहे:

  • बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राच्या भौगालिक वैशिष्टये लक्षात घेता पावसाळ्यात व समुद्राला भरती असण्याच्या वेळी पाऊस आल्यास, अशावेळी पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे होण्यासाठी महापालिका क्षेत्रात विविध प्रकारच्या पर्जन्यजल वाहिन्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने भूमिगत वाहिन्या आणि पावसाचे पाणी वाहून नेणा-या नाल्यांचा अंतर्भाव होतो. पावसाचे पाणी वाहून नेणा-या या यंत्रणेद्वारे पाण्याचा निचरा योग्यप्रकारे व्हावा, यासाठी या यंत्रणेची साफसफाई व परिरक्षण (Maitainance) हे महापालिकेच्या 'पर्जन्यजल वाहिन्या' (Storm Water Drain) या खात्याद्वारे केले जाते.

  • बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येणारी पर्जन्यलज वाहिन्यांची व नालेसफाईची कामे ही वर्षभर केली जात असतात. या कामांपैकी ६० टक्के कामे ही सामान्यपणे एप्रिल व मे या पावसाळ्यापूर्वीच्या दोन महिन्यात केली जातात. तर उर्वरितपैकी २० टक्के कामे ही पावसाळ्यादरम्यानच्या ४ महिन्यात व २० टक्के कामे ही पावसाळ्यानंतरच्या ६ महिन्यात करण्याची पद्धत आहे. यानुसार खुल्या पद्धतीच्या नाल्यांची आणि भूमिगत स्वरुपाच्या पर्जन्यजल वाहिन्यांचीयथायोग्य साफसफाई पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर नियमितपणे केली जाते. तथापि, बंद व भूमिगत स्वरुपाच्या पर्जन्यजल वाहिन्यांचा असणारा मर्यादित आकार व त्यात विषारी वायू असण्याची शक्यता लक्षात घेऊन, आतापर्यंत या वाहिन्यांची सफाई ही केवळ 'मॅनहोल' व त्याच्या दोन्ही बाजूकडील मर्यादित भागात गाळ ओढून घेण्या-या सक्शन पाईप' द्वारे केली जात असे.

  • मात्र, यावर्षीपासून भूमिगत वाहिन्यांच्या आत जाऊन सफाई करणारे 'मिनी रोबो' हे अत्याधुनिक यंत्र उपयोगात आणले जाणार आहे. ज्यामुळे भूमिगत स्वरुपाच्या पर्जन्यजल वाहिन्यांची अंतर्गत सफाई ही पहिल्यांदाच होणार आहे. याबाबत संबंधित निविदेतील अटी व शर्तींनुसार निविदा बहाल झालेल्या कंपनीने 'मिनी रोबो' या अत्याधुनिक यंत्राचे २ नग खरेदी केले आहेत. तर महापालिकेने देखील हे १ यंत्र खरेदी केले आहे. ही तिन्ही यंत्रे 'नवीन वर्ष २०१९' मध्ये पावसाळापूर्व साफसफाईसाठी उपयोगात आणली जाणार आहेत.

  • 'मिनी रोबो' हे यंत्र दूरसंवेदकाद्वारे (Remote Control) नियंत्रित केले जाते. हे 'मशिन' जलरोधक असल्याने व लहान आकाराचे असल्याने वाहिनीत जाऊन सहजपणे काम करु शकते. तथापि, २८० अश्वशक्तीच्या वाहनावरील पंपास हे यंत्र जोडलेले असल्याने ते तेवढ्या ताकदीने गाळ खेचू शकेल.

  • 'मिनी रोबो' चालविण्यासाठी जनित्राचा (Electric Generator) वापर केला जाणार असून ते स्वतंत्रपणे मिनीरोबोला जोडलेले असेल.

  • या यंत्रावर असणा-या 'सीसीटिव्ही कॅमेरा'द्वारे प्राप्त होणारी थेट दृश्ये (Live footage) पाहून यंत्र कुठे वळवायचे व त्याचा वापर कसा करावयाचा? याचा निर्णय दूरनियंत्रक चालकास (Remote Control Operator) घेता येणार आहे.

  • या यंत्राद्वारे ओढून घेतला जाणारा गाळ हा बाहेर असलेल्या 'टँकर'च्या टाकीत साठवला जाईल. तसेच याच यंत्राद्वारे पाण्याच्या अतिशय ताकदीने केलेल्या फवा-याने वाहिन्यांची अंतर्गत साफसफाई करता येणार आहे.

  • वाहिन्यांमध्ये अत्यंत कठिण - कडक झालेला (Hard) गाळ असल्यास व तो पाण्याच्या फवा-यानेही निघत नसल्यास; अशा गाळाचे तुकडे करुन तो गाळ काढता यावा, यासाठी या यंत्राला 'ड्रिल मशिन' जोडलेले आहे. हे 'ड्रिल मशिन' देखील 'रिमोट'द्वारेच नियंत्रित केले जाणार आहे.

  • भूमिगत वाहिन्यांची अंतर्गत साफसफाई ही यंत्राद्वारेच व मानवविरहित पद्धतीने केली जाणार आहे. ज्यामुळे या वाहिन्यांच्या अंतर्गत सफाईसाठी कामगारांना वाहिन्यांमध्ये उतरावे लागणार नाही. परिणामी, भूमिगत वाहिन्यांमध्ये असणा-या संभाव्य विषारी वायुच्या प्रतिकूल परिणामांपासून कामगारांचे किंवा संबंधित कर्मचा-यांचे संरक्षण देखील साधले जाणार आहे.

  • 'मिनी रोबो'द्वारे साफसफाई केल्यानंतर 'टँकर' मध्ये जमा झालेल्या गाळाची यथोचित प्रकारे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराचीच असणार आहे. तसेच कंत्राटदाराच्या सर्व वाहनांची स्थिती व वापर याबाबतची माहिती पालिकेकडे तात्काळ व नियमित स्वरुपात प्राप्त व्हावी, याकरिता संबंधित सर्व वाहनांमध्ये 'व्हीटीएमएस' (Vehicle Tracking Monitoring System) बसविणे यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले आहे.

===


बातमीबाबत पूरक माहिती

'मिनी रोबो' या अत्याधुनिक व 'रिमोट कंट्रोल्ड' यंत्राच्या आधारे करण्यात येणा-या भूमिगत पर्जन्यजल वाहिन्यांची विभागानिहाय साधारण लांबी पुढीलप्रमाणे:

अनु. क्र.

प्रशासकीय विभाग

कमान वाहिन्या

(Arch Drain)

'पाईप' वाहिन्या

(Pipe Drain)

भूमिगत वाहिन्यांची एकूण लांबी (मीटरमध्ये)

1

3545

90

3635

2

बी

398

2565

2963

3

सी

1287

3246

4533

4

डी

3793

1153

4946

5

1235

6155

7390

6

एफ /दक्षिण

7025

2900

9925

7

एफ /उत्तर

7860

1730

9590

8

जी /दक्षिण

3622

5923

9545

9

जी /उत्तर

6928

10830

17758


एकूण

35693

34592

70285


रिपोर्टर

संबंधित पोस्ट