महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतिने भव्य बनियन मुकमोर्चा

 माथाडी कायदा व कामगार चळवळीची मोडतोड आणि कामगार विरोधी कृती करणा-या राज्याचे कामगार मंत्री, कामगार विभागाचे प्रधान सचिव व पणन विभागाचा निषेध करण्यासाठी आणि माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नाची सोडवणुक होण्याकरीता स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेणू यांच्या स्मृतीदिनी दि.12 डिसेंबर रोजी माथाडी,वारणार, मापाडी,सुरक्षा रक्षक कामगार, पालावाला महिला व अन्य घटकांचा माथाडी भवन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक,वाशी येथे महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतिने भव्य बनियन मुकमोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे,सातारा, कोल्हापूर, लातूर,अहमदनगर व इतर जिल्ह्रांतही माथाडींच्या मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीमुंबईत निघालेल्या या मुकमोर्चात माथाडी कामगार नेते कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप,अखिल भारतीय माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे चंद्रकांत शेवाळे,महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे नेते बळवंतराव पवार,पोपटराव पाटील,सतीशराव जाधव,सुरक्षा रक्षक संघटनेचे प्रतिनिधी आदी नेते सहभागी होते. कामगार नेते डॉ.बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे,त्यात या सर्व नेत्यांचा समावेश आहे. ही समिती माथाडी कामगारांच्या मागण्यांसाठी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने तीव्र आंदोलने करीत असून,सरकार मात्र याची दखल घेत नाही.
महाराष्ट्र कृषि पणन (विकास व विनियमन) अधिनियम,1963 यात आणखी सुधारणा करण्यासाठी सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढलेल्या दि.25/10/2018 च्या अध्यादेश क्र.24 ला स्थगिती देणे यासंबंधी सर्व संबंधित घटकांची समिती गठीत करणे,याच विभागाने मापाडी-मापारी कामगारांच्या तोलाईची मजूरी कपात न करण्याबाबत काढलेला दि.01/12/2018 चा आदेश स्थगित करणे,सुरक्षा रक्षक मंडळामार्फत सुरक्षा रक्षकांच्या वेतनातून कर्जाच्या हप्त्याची रक्कम कपात न करण्याबाबत कामगार विभागाने काढलेल्या दि.28/09/2018 च्या,माथाडी मंडळाच्या प्रशसकीय कामकाजामध्ये सुधारणा सुचविण्यासाठी समिती स्थापन केल्याबाबतच्या दि.29/10/2018 च्या व माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेतील कर्मचा-यांच्या बदल्यासंबंधी काढलेल्या दि.20/11/2018 च्या शासन निर्णयास स्थगिती देणे, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.19/06/2018 रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकितील निर्णयाची अंमलबजावणी होणे,माथाडी सल्लागार समितीवर कामगार नेत्यांना घेणे,विविध माथाडी मंडळाच्या पुर्नंरचना करुन त्यावर नोंदीत कामगारांचे प्रतिनिधीत्व करणा-या कामगार नेत्यांना घेणे,माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना घेणे,माथाडी मंडळावर चेअरमन/सेक्रेटरी यांच्या नेमणुका करणे आदी प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समिती व महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने लाक्षणिक बंद, मोर्चे,आझाद मैदान,मुंबई येथे आमरण उपोषण यासारखी तीव्र आंदोलने केली,परंतु शासनाचे कामगार मंत्री, कामगार विभागाचे प्रधान सचिव व पणन विभाग माथाडी कायदा व कामगार चळवळीची मोडतोड करण्याचे अध्यादेश व शासन निर्णय पारीत करीत असल्याचा निषेध मुकमोर्चात करण्यात आला. मुजोर सरकार कष्टकरी माथाडी कामगारांच्या न्याय्य मागण्यांची सोडवणुक करण्याकडे दुर्लक्ष करुन त्यांचेवर अन्याय करण्याची भुमिका घेत असल्याबद्दल कामगार नेत्यांनी खेद व्यक्त केला.
माथाडी भवन येथून निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्यानंतर माथाडींचे आराध्यदैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील व स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा बाबु गेणू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन संतप्त कामगार नेते व कार्यकर्त्यांनी त्यांनी आपले बनियन व शर्ट काढून रणरणत्या उन्हात दोन तास ठिय्या आंदोलन केले. माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या संबंधीत असलेल्या प्रश्नांचे निवेदन यावेळी महाराष्ट्र माथाडी संघटना कृती समितीच्यावतिने सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांचेकडे सुपुर्द केले, यानंतर माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुकमोर्चाला संबोधीत करताना असे म्हटले की,माथाडी कामगारांच्या रास्त मागण्या मान्य झाल्याशिवाय आंम्ही अशीच तीव्र आंदोलने करु,वेळ पडल्यास कामगार मंत्री व कामगार विभागाच्या प्रधान सचिवाच्या कार्यालयात अशीच शर्ट व बनियन काढून आंदोलने करु. यानंतर त्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे जाहिर केले. या मुकमोर्चात एकनाथ जाधव,वसंतराव पवार,आनंद पाटील, चंद्रकांत पाटील,गुंगा पाटील,रविकांत पाटील,अरुण रांजणे,प्रकाश पाटील,हणमंतराव सुरवसे,अशोक पाटील, चंद्रकांत बोबेडे,लक्ष्मणराव भोसले,शिवाजी सुर्वे आदी पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित पोस्ट