म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या दबावामुळे छत कोसळलेल्या यानगृहाच्या इमारतीचे काम पालिकेने थांबवले

मुलुंड:(शेखर भोसले)महानगर पालिकेच्या मालाड यानगृहाचे छत कोसळून झालेल्या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी काम बंद आंदोलन करण्याचा ईशारा पालिका प्रशासनाला दिल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले असून, महापालिकेच्या कामगार, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासनाने विकासकाला, जोपर्यंत पुनर्बांधणी चालू असलेल्या इमारतीच्या सभोवती संरक्षक जाळी विकासकामार्फत बसवली जात नाही, तोपर्यंत पुढील काम चालू ठेवण्यास मज्जाव केला असून इमारतीत कोणतेही काम करता येणार नाही असा आदेश विकासकाला देण्यात आला आहे. त्यामुळे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने कर्मचारी, 

कामगारांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या रोखठोक भूमिकेबद्दल अध्यक्ष बाबा कदम, सचिव संजय वाघ यांचे विशेष आभार मानले आहेत.

मालाड येथील पालिका यानगृहाच्या बाजूला  न्यू अवेन्यू इमारतीचे गेल्या ५ वर्षांपासून  पुनर्बांधणीचे काम चालू आहे या इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येत असलेल्या सळ्या, दगड, माती सतत यानगृहाच्या छतावर पडत असतात. त्यामुळे विकासकाला सुरक्षेसाठी इमारतीभोवती जाळी (नेट) लावण्याची वारंवार विनंती करण्यात आली आहे परंतु विकासकाने सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवले असूनही, विकासकावर महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही आहे. दि ६ जानेवारीला या इमारतीचे काम चालू असताना काही सळ्या यानगृहाच्या छतावर   पडल्याने, यानगृहाचे छत कोसळले. छत कोसळल्याने यानगृहात काम करणारे पालिका कामगार जिवाच्या भीतीने सैरावैरा पळाले त्यामुळे थोडक्यात बचावले अन्यथा मोठा अपघात होवून पालिका कर्मचारी गंभीर जखमी झाले असते. 

कामगार कर्मचारी दिवसभर जीव धोक्यात घालून यानगृहात काम करीत असल्याने याबाबत महापालिकेच्या परिवहन खात्याचे कार्यकारी अभियंता फडणीस, महापालिका आयुक्त, इमारत प्रस्ताव विभाग व मालाड पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मालाड पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीची दखल घेवून स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी घटना स्थळी येवून विकासकाला सुरक्षेचे नियम पाळूनच काम करावे अन्यथा काम थांबवावे, अशी सक्त ताकीद दिली. 
परंतु पालिका प्रशासनाने सुरुवातीच्या काळात कोणतीही भूमिका न घेतल्याने व विकासकावर कोणतीही कारवाई न केल्याने कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासना विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे चिटणीस संजय वाघ, महेश गुरव, राजेश इंदुलकर यांनी कामगार, कर्मचाऱ्यांची भेट घेवून प्रशासनाबरोबर विकासकावर कारवाई करण्याची मागणी केली होती तसेच सदर विकासकावर तातडीने कारवाई करावी अन्यथा या विकासकाविरोधात युनियनला काम बंद आंदोलन करावे लागेल असा ईशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने विकासकाला सज्जड दम देवून संरक्षक जाळी लावल्याशिवाय काम सुरू करण्यास मनाई केली आहे. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट