कल्याण-डोंबिवलीत मनसेचे कायदेभंग आंदोलन

डोंबिवली :(प्रतिनिधी)मुंबई लोकल लवकर सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती.या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक आणि परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी कायदा, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
मनसेतर्फे सविनय कायदेभंग आंदोलनाची देण्यात आली होती. चाकरमान्यांचा त्रास कमी करावा, रेल्वे प्रवास सर्वांसाठी खुला करावा, लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरू कराव्यात, या मागणीकरिता सरकार विरोधात सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. मात्र सद्याच्या कोव्हीड महामारीमुळे उद्भवलेल्या भयंकर प्रसंगांना तोंड देताना नाकीनऊ आलेल्या प्रशासनांची चहोबाजूंनी गोची झालेली असतानाच मनसेने कायदेभंग आंदोलनाची हाक दिल्याने लोहमार्ग व शहर पोलिसांनी फौजदारी अस्त्र बाहेर काढले आणि फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 149 प्रमाणे शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावून जमावबंदी आदेशाचे उल्लघंन केल्यास कारवाया करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र या नोटिसांना झुगारून कल्याण आणि डोंबिवली स्थानक परिसरात मनसैनिकांनी सोमवारी सकाळी सविनय कायदेभंग आंदोलन छेडले.
मनसेच्या कल्याण शहर शाखेच्यावतीने कल्याण रेल्वे स्थानकात मनसे पदाधिकरी व मनसैनिकांनी रेल्वे स्थानकात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत या मनसैनिकांना रेल्व स्टेशन प्रवेशद्वारावरच रोखले. त्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मनसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. आज तुम्ही अडवलात, मात्र उद्या जनआंदोलन घेतले तर तुम्ही अडवू शकणार नाही. जर लोकल सेवा चालू झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन सर्वसामान्यांसाठी करेल. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर लोकल सुरू करत जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन उग्र रूप धारण करेल, असा इशारा माजी आमदार तथा मनसेचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, जिल्हाध्यक्षा स्वाती कदम, शहराध्यक्षा शीतल विखणकार, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, सुनीता शेलार, वासंती जाधव, आदी पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सर्वांची सुटका केली. तर दुसरीकडे मनसेच्या डोंबिवली शहर शाखेनेही डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर जोरदार आंदोलन केले. डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर देखील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष राजेश कदम, ज्येष्ठ नेते तथा संघटक प्रल्हाद म्हात्रे, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष सागर जेधे, राहूल कामत, दीपिका पेडणेकर, सुमेधा थत्ते, शर्मिला लोंढे, हरीश पाटील, विजय शिंदे, प्रकाश भोईर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मनसैनिकांनी रेल्वे स्थानकात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत मनसैनिकांना रोखले. त्यामुळे त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदविला. रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठीही सुरू करण्यात यावी, अशी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष राजेश कदम यांनी लावून धरली होती. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मनसेच्या 6 महिला पदाधिकारी व 25 पुरूष पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र नंतर या सर्वांना सोडून देण्यात आले.

संबंधित पोस्ट