अंबरनाथमध्ये चाकरमान्यांसाठी एसटीच्या जादा गाड्या . मनसेच्या प्रयत्नांना अखेर यश.

अंबरनाथ (प्रतिनिधी) : रेल्वे लोकल सेवा बंद असल्याने अंबरनाथमधील चाकरमान्यांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी जादा एसटी बस सोडण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने शुक्रवारी  सकाळी दोन जादा बस सोडण्यात आल्या आहेत.
             
अंबरनाथ शहरातून उपनगरांमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाऊन च्या नंतर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सुरू केलेल्या अनलॉक प्रक्रियेनंतर शासकीय कार्यालयांसोबतच अनेक खाजगी आस्थापना देखील सुरू झाल्या आहेत. मात्र दळणवळणाचे मुख्य साधन असलेली रेल्वे सेवा बंद असल्याने नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नोकरदार वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या माध्यमातून कामगार वर्गासाठी सुरू करण्यात आलेली वाहतूक व्यवस्था तोकडी पडत असल्याने धावणाऱ्या बस गाड्यांमध्ये कमालीची गर्दी होत होती. हीच बाब लक्षात घेऊन शहरात जादा बसगाड्या सोडण्याची मागणी अंबरनाथमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष  कुणाल सुभाष भोईर यांनी विठ्ठलवाडी बस आगार व्यवस्थापनाकडे मंगळवारी  केली होती. या मागणीनुसार शुक्रवारी अंबरनाथ शहरातून कामगारांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून २ अधिक गाड्या सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मनसेचे मोरिवली गावचे शाखाप्रमुख संदीप भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले निवेदन विठ्ठलवाडी आगारातील एसटी च्या अधिकाऱ्यांना दिले होते.


शुक्रवारी सकाळी राज्य परिवहन मंडळाच्या वतीने अंबरनाथ पश्चिम  बाजूला असलेल्या महात्मा गांधी विद्यालय समोरून सकाळी ८ वाजता , ८:३० वाजता दोन बस सोडण्यात आल्या. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी बस समोर नारळ फोडून बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. विठ्ठलवाडी बस आगार प्रमुख श्रीमती शेळके यांनी प्रवाशांची संख्या लक्षात घेता अंबरनाथ पूर्व विभागातून सुधा बस सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिल्याचेही कुणाल भोईर यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट