लोकलच्या फेऱ्या वाढवा, पूर्वीप्रमाणे सर्व स्थानकांवर थांबा द्या . उपनगरीय रेल्वे प्रवाशी एकता सस्थेची मांगणी .

बदलापूर (प्रतिनिधी) : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष लोकल  सेवा सुरु केली आहे.  त्यामुळे या कर्मचाऱ्यांची कार्यालय गाठताना होत असलेली गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र कल्याण-कर्जत मार्गावर काही स्थानकांवर थांबा वगळण्यात आल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची गैरसोय कायम राहिली आहे. त्यात आता कर्मचारी उपस्थिती वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात आल्यामुळे लोकलमध्ये गर्दी  वाढत असून फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीत अधिक  भरच पडत असल्याचे दिसत आहे.
                                                      
राज्य शासनाने नुकतेच शासकीय कार्यालये ५० टक्के व खाजगी कार्यालये ३० टक्के उपस्थितीने सुरु करण्याबाबत निर्णय घेतला आहे. सध्या सुरु असलेल्या विशेष लोकल फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आहेत. त्यामुळे इतर प्रवासी या लोकलने प्रवास करीत नाहीत हे जरी खरे असले तरी कार्यालयांतील उपस्थितीचे प्रमाण वाढवण्यात  आल्यामुळे स्वाभाविकच प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये फिजिकल डिस्टंसिंग राखणे शक्य होत नसल्याचे दिसत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी विशेष लोकल सेवेचा दुसरा टप्पा म्हणून रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील

कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विशेष लोकल सेवेच्या फेऱ्या वाढवाव्यात,अशी मागणी मध्य रेल्वे उपनगरीय सल्लागार समितीचे माजी सदस्य व उपनगरीय प्रवासी एकता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी केली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरु करताना रेल्वे प्रशासनाने कर्जत मार्गावरील ५ व कसारा मार्गावरील ७ स्थानके वगळून थांबे दिले आहेत. त्यामुळे या भागात राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. कल्याण -कर्जत दरम्यान  भिवपुरी, शेलू व वांगणी या तीन स्थानकांना थांबा देण्यात आलेला नाही. एकट्या वांगणीतच अत्यावश्यक सेवेत काम करणारे १५७ कर्मचारी आहेत. त्याचप्रमाणे भिवपुरी व शेलू परिसरातही अत्यावश्यक सेवेत काम करणारे अनेक शासकीय कर्मचारी राहत आहेत. या कर्मचाऱ्यांना रस्ते मार्गाने ८-१० किमी प्रवास करून नेरळ किंवा बदलापूर स्थानक गाठावे लागत आहे. यासाठी लागणारा वेळ व खर्च पाहता हे या कर्मचाऱ्यांसाठी गैरसोयीचे ठरत आहे.या  पूर्वी नियमितपणे लोकलसेवा सुरु असताना या स्थानकांवर थांबा देण्यात येत होता. आता कर्मचाऱ्यांसाठी काही मोजक्याच विशेष लोकल सुरु असताना हे थांबे वगळून काय साध्य होणार आहे ? असा मनोहर शेलार यांचा सवाल आहे. जवळच्या स्थानकांवर थांबा  नसल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या गैरसोयीची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने कर्जत व कसारा मार्गावर पूर्वीप्रमाणे थांबे द्यावेत, अशी मागणी  उपनगरीय प्रवासी एकता संस्थेच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली असल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट