कल्याण डोंबिवलीचा देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत २२ व्या स्थानावर

कल्याण (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या देशातील स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेने २२ वा क्रमांक पटकावत आपली घोडदौड कायम राखली आहे. देशातील अस्वच्छ शहरांपैकी एक शहरापासून सुरू झालेला कल्याण डोंबिवलीचा देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत २२ व्या स्थानापर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे.

देशातून तब्बल ४ हजार शहरांचा समावेश असणाऱ्या केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात कल्याण डोंबिवलीला फारशी समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळेच २०१७ मध्ये २३४ व्या स्थानावर असणाऱ्या कल्याण डोंबिवलीने आज प्राप्त केलेला २२ वा क्रमांक नक्कीच दिलासादायक आहे. कारण २०१७ नंतर केडीएमसी प्रशासनाने कचऱ्यासंदर्भात राबवलेल्या उपाययोजना आणि त्याला शहरातील नागरिकांकडून हळूहळू का होईना पण सकारात्मक प्रतिसाद लाभत असल्याचेच आकडेवारीवरून दिसत आहे. स्वच्छ सर्वेक्षणात केडीएमसीला २०१७ मध्ये २३४ वा क्रमांक, २०१८ मध्ये ९७ वा क्रमांक, २०१९ मध्ये ७७ वा क्रमांक मिळाला होता. यंदा त्यामध्ये आणखीन वाढ होऊन पहिल्या २५ स्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण डोंबिवलीचा समावेश झाला आहे. यंदा केडीएमसीला स्वच्छ सर्वेक्षणात ४ हजार ९१ गुण मिळाले आहेत. गेल्या काही महिन्यात कचरा वर्गीकरणावर देण्यात आलेला भर, कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी झालेली आश्वासक कार्यवाही आदी केडीएमसीच्या जमेची बाजु ठरली आहेत.

तर एकीकडे २२ वा क्रमांक आला असला तरी अद्याप केडीएमसीसमोर आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद कायमस्वरूपी बंद करण्याचे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामध्ये यश मिळाल्यानंतर हा क्रमांक आणखीन वर येऊ शकेल यात वाद नाही. त्याचजोडीला केडीएमसीने स्वच्छ शहरांसाठी सुरू ठेवलेले आपले प्रयत्न आणि नागरिकांचे त्यामध्ये असणारे योगदान या दोन्ही गोष्टीही अखंडपणे सुरू राहणे तितकेच महत्वाचे असणार आहे.

आधारवाडी डम्पिंग बंद करण्याला प्राधान्य – रामदास कोकरे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याला प्रथम प्राधान्य देण्यासह ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण १०० टक्के कसे होईल यावर आमचा भर असणार आहे. जेणेकरून येत्या काळात लोकांना स्वच्छ शहराचे दृश्य परिणाम पाहायला मिळतील आणि स्वच्छ सर्वेक्षणात केडीएमसीचा क्रमांक आणखी वरचा आलेला असेल.

संबंधित पोस्ट