आदिवासी बांधवांचा शिक्षणाचा हक्क डावलू नका

■ आदिवासी दिनी श्रमजीवीच्या सरकारला इशारा

पालघर(प्रतिनिधी/९ऑगस्ट): लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने ऑनलाईन शिक्षण प्रणाली अंमलात आणली आहे, या प्रणालीचा अभिनव सत्याग्रह करत श्रमजीवी संघटनेच्या युवकांनी समाचार घेतला आहे, ऑनलाईन क्लास साठी आदिवासी ग्रामीण विद्यार्थ्यांनाही अँड्रॉइड मोबाईल,लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्याची मागणी आज श्रमजीवीने केली असून आदिवासी बांधवांचा शिक्षणाचा हक्क डावळू नका, असा इशाराही श्रमजीवीकडून सरकारला देण्यात आला आहे. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधात ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयासमोर सत्याग्रह करून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना गटविकास अधिकाकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
आदिवासी दिनानिमित्त श्रमजीवि कडून करण्यात आलेल्या आंदोलनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या. १ ) दुर्गम , ग्रामीण / आदिवासी भागात इंटरनेटची नेटवर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी .  २ ) प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांना लॅपटॉप किंवा स्मार्ट फोन तात्काळ उपलब्ध करुन द्यावा. ३ ) ज्या दुर्गम भागात वीज नाही त्या ठिकाणी वीजेची उपलब्धता निर्माण करून द्यावी . 
४ ) प्रत्येक आदिवासी व गरीब विद्यार्थ्याला इंटरनेट डेटा रिचार्ज करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा . वरील शैक्षणिक साहित्य व साधने उपलब्ध न झाल्यास ठाणे , पालघर , नाशिक व रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी कार्यालयात शिक्षण देण्याची व्यवस्था करावी आपणाकडून आमच्या मुलांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवल्यास व कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहिल . याची कृपया नोंद घ्यावी . आपण संवेदनशील मंत्री आहात म्हणून ती वेळ येऊ देणार नाहीत अशी अपेक्षा आहे असे शेवटी निवेदनात नमूद केले आहे.
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, संस्थापिका विद्युलता पंडित आणि अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सत्याग्रहात आज प्रत्येक पंचायत समिती बाहेर सत्याग्रह करून श्रमजीवी तरुणांनी सरकारला जाब विचारला.

संबंधित पोस्ट