आजचा संघर्ष आहे तो उद्याचे नवीन सामर्थ्य निर्माण करू शकतो

मी पै. संदीप (भाऊ) शेंडगे, वस्ताद (जय हनुमान तालीम संघ, वाखरी)  एका छोट्याशा संघर्षाची गोष्ट सांगू इच्छितो, जो आजचा संघर्ष आहे तो उद्याचे नवीन सामर्थ्य निर्माण करू शकतो पण यासाठी लोकांनी विचार बदलले पाहिजेत म्हणजे नक्कीच त्यांच्या मुलांचे भविष्य बदलेल. जो संघर्ष स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गावपातळीवर चालू होता आणि त्याच संघर्षातून हिंद केसरी  मारुतीभाऊ माने यांच्या सारख्या मल्लांनी  गावपातळीवर खेडेगावातील तालमीत सराव करत खूप  मेहनत करून आपल्या देशाचा तिरंगा झेंडा सातासमुद्रापार फडकावला. मला असे वाटते कि ते दिवस आता पाहायला मिळत नाहीयेत तीच जिद्द,तीच चिकाटी, तोच संघर्ष हरियाणा मधील खेडेगावांमध्ये पाहायला मिळत आहे आणि हेच कारण आहे कि ज्यामुळे तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल तयार होत आहेत आणि आपली व आपल्या देशाची मान उंचावत आहेत. हेच महाराष्टाच्या वैभव परत मिळवण्यासाठी आणि आपल्या मुलांनाही आधुनिक काळातील मॅटवरील कुस्ती आणि उत्तम प्रशिक्षक(कोच) मिळावेत यासाठी आम्ही उभारलेली हि छोटीशी चळवळ,         


सर्वप्रथम आम्ही कुस्तीबद्दल जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आणि यामध्ये १४ वार्षांखालील मल्लांच्या पालकांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर आजच्या काळातील कुस्तीची गरज  व आपली मुले यांच्याविषयी संवाद साधला आणि याचाच परिणाम म्हणून गावातील तालमीत पन्नास ते साठ मुले व  मुली प्रशिक्षणासाठी येऊ लागली. काही दिवसांनी शालेय कुस्ती स्पर्धामध्ये आपली मुले अत्याधुनिक सुविधांमुळे मागे पड्तायेत हि गोष्ट आमच्या लक्षात आली त्यामुळे आम्हाला मॅट आणि इतर  साहित्याची कमतरता जाणवली. आता या साहित्यासाठी गरज होती ती पैश्यांची म्हणून आम्ही गावातील तरुण मुले, त्यांचे पालक आणि वडीलधारी माणसे यांच्याशी या समस्येवर चर्चा केली आणि गावातील लोकांनीही लोकवर्गणीतून हे साहित्य उभं  करायचं ठरवलं. एवढंच  नाही तर वाखरी ग्रामस्थ व तालुक्यातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली. २ लाख रुपयांपर्यंत लोकवर्गणी जमा झाली.