पहिल्यांदाच श्रावणी सोमवारी.. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात शुकशुकाट.

अंबरनाथ / प्रतिनिधी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन शिवमंदिर दरवर्षी श्रावणात भक्तांच्या गर्दीने फुलून जाते. परंतु यंदा मात्र पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्श्व भूमीवर मंदिर बंद असल्याने पहिल्या श्रावणी सोमवारीही या मंदिर परिसरात शुकशुकाट होत
अंबरनाथचं शिवमंदिर हे शिलाहार राजा मम्बवाणी यांनी इ. स.१०६० साली उभारलं. या मंदिरातल्या महादेवाला अंबरेश्वर म्हणून संबोधलं जातं. त्यावरूनच अंबरनाथ हे शहराचं नाव पडलं आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून अंबरनाथच्या शिव मंदिराकडे पाहिलं जातं. हेमांडपंथी बांधकाम असलेल्या शिवमंदिराचा युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारशांच्या (वर्ल्ड हेरिटेज) यादीतही समावेश आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दर सोमवारी भाविकांची गर्दी होत असते. श्रावण महिन्यात तर दुरदूरचे भाविकही दर्शनासाठी इथे येत असतात. त्यामुळे श्रावण महिन्यात हे मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेले पाहायला मिळते. त्याशिवाय येथिल स्थापत्य कलेचा अभ्यास करण्यासाठीही अनेक अभ्यासकही या मंदिराला भेट देत असतात. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार मार्च महिन्यापासून हे मंदिरही बंद आहे.केवळ मंदिराचे पुजारी मंदिरात जाऊन नित्यपूजा करत असतात. मात्र किमान श्रावण महिन्यात तरी मंदिर उघडेल, फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करून सुरक्षिततेचे उपाय करून मंदिरात प्रवेश दिला जाईल, अशी भाविकांची अपेक्षा होती. मात्र आता मंदिर श्रावण महिन्यातही बंद राहणार आहे.सुमारे ९६० वर्षे जुने असलेले हे प्राचीन शिवमंदिर यंदा प्रथमच भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. , कोरोनाचा वाढता  प्रादुर्भाव लक्षात घेता श्रावणी सोमवारी होणारी भाविकांची गर्दी  त्रासदायक ठरण्याची शक्यता असल्याने मंदिर उघडू नये असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. त्यानुसार मंदिर प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने दर्शनासाठी आलेले अनेक भाविक प्रवेश द्वारालाच पुष्पहार अर्पण करून परत गेले. श्रावण मासानिमित्त गेल्या पंधरा वर्षांपासून नियमित होणारा श्रावण मास महोत्सव  देखील कोरोनामुळे यंदा होऊ शकला नाही. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ खाजगी सुरक्षा रक्षक आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संबंधित पोस्ट