पालिका कर्मचाऱ्यांना खाजगी रुग्णालयात मिळणार राखीव बेड

बदलापूर / प्रतिनिधी : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांना खाजगी रुग्णालयात राखीव बेड उपलब्ध करून देण्यात येणार, असल्याची माहिती भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे  सेक्रेटरी लक्ष्मण कुडव यांनी दिली आहे. 

कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी व भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नगर परिषद कार्यालयात झाली. या बैठकीत कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांना खाजगी रुग्णालयात राखीव बेड उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस लक्ष्मण कुडव यांनी दिली. दुर्दैवाने कोरोना काळात काम करताना काही बरे वाईट पालिका कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा देण्यात लागू असेल असा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.सातव्या वेतन आयोगाचा देय हप्ता तसेच चांगल्या दर्जाचे पावसाळी साहित्य लवकरात लवकर मिळावे. तसेच पन्नास किंवा त्याहून अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये काम देऊ नये अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली. त्यावर सातव्या वेतन आयोगाचा देय हप्ता एक महिन्याचे आत देण्याचा प्रयत्न केला जाईल व पावसाळी साहित्यही लवकरात लवकर दिले जाईल असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिल्याचे लक्ष्मण कुडव यांनी सांगितले. सदर बैठकीला कुडव यांच्यासह भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील युनिट अध्यक्ष विनोद वाल्मिकी, उपाध्यक्ष पाचंगे व कमिटी मेंबर उपस्थित उपस्थित होते.

संबंधित पोस्ट