जिम सुरू करण्याची अजित राऊत यांची मागणी

पालघर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशनचा पाठपुरावा

पालघर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे इतर व्यवसायांबरोबरच जिम व्यवसायही बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र जुलैमध्ये अनलॉक जाहीर झाल्यानंतरही जिमवरील बंदी कायम असल्याने जिम चालविणारे व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत तर जिम सुरू नसल्याने नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे जिम सुरू करून जिम व्यवसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालघर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष अजित राऊत यांनी केली आहे. तर याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
           
याबाबतचे निवेदन लवकरच क्रीडा मंत्री व पालघर जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असून गेल्या ३ महिन्यापासून जिम बंद असल्याने जिम चालक आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही करण्यात येणार असल्याचे अजित राऊत यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात १००० जिम असून त्यावर ५०००  च्यावर प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह चालत असून अनेक जिम चालक हे भाड्याच्या ठिकाणी जिम चालवीत आहेत. जागेचे भाडे, लाईट बिल, बँकांचे हप्ते, दुरुस्ती खर्च, प्रशिक्षकांचे पगार अन्य खर्चामुळे जिम चालक अडचणीत सापडले आहेत. तर जिम बंद असल्याने नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्ती, खेळाडू यांची गैरसोय होत आहे.
       
 दरम्यान शासनाने जिम सुरू करण्यास परवानगी दिल्यास सोशल डिस्टनसिंग पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, गर्दी होणार नाही यासाठी नियोजन करणे अशा सर्व नियमांचे पालन जिम मालकांकडून करण्यात येईल, असेही अजित राऊत यांनी सांगितले आहे.

संबंधित पोस्ट