कोव्हीड रुग्णांच्या वापरलेल्या वस्तूंची सार्वजनिक रस्त्यावर विल्हेवाट

डोंबिवली (श्रीराम खंडू) : कोव्हीड - १९ अर्थात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर केलेल्या उपचारांचा उर्वरित कचरा-वस्तू रूग्णालयातून थेट रस्त्यावर आणून टाकला जात असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. व्हायरसमुळे दिवसेंदिवस रुग्ण वाढ होत असताना सार्वजनिक ठिकाणी याच रुग्णांसाठी वापरलेल्या वस्तू वजा कचरा सार्वजनिक ठिकाणी गुपचुपपणे आणून टाकण्याचा हा प्रकार तर कोव्हीड - १९ महामारीला पोसण्याचा अर्थात फैलावण्याचा असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या निवासी भागातील मिलापनगर तलावासमोर बायोमेडिकल वेस्टच्या प्लास्टिक पिशव्या कुणीतरी आणून टाकल्या होत्या. त्या पिशव्यांमध्ये हातमोजे, मास्क, प्लास्टिक, रबर सदृश्य वस्तू दिसून आल्याने जवळपास राहणाऱ्या रहिवाश्यांमध्ये आजही भीतीचे वातावरण आहे. डोंबिवलीच्या एमआयडीसीच्या फेज - २ मध्ये डोंबिवली नागरी सहकारी बँक ते दुर्वांकुर हॉल दरम्यान सर्व्हिस रोडच्याकडेला कोव्हीड - १९ च्या रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये वापरले जाणारे पीपीई किट आणि इतर वापरलेले साहित्य (मेडिकल वेस्टेज) मोठ्या प्रमाणात गोण्यांमध्ये भरून आणून टाकण्यात आले असल्याने संबंधित दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी अनेक संतप्त स्थानिकांनी मागणी केली आहे. विशेष म्हणजे बँकेसमोरच्या कल्याण-शिळ मार्गाला जोडणारा रस्ता बंद असल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करत असतात. तसेच या जागेच्या आजूबाजूला लहान-मोठ्या कंपन्या, महावितरणचे कार्यालय आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांचा, तसेच सोनारपाडा, म्हात्रेपाडा, निवासी विभागातील रहिवाश्यांचाही या भागात वावर असतो. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगपालिका आयुक्त, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासाने या गंभीर समस्यकडे लक्ष घालावे आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी गिरीमित्र प्रतिष्ठानचे मंगेश कोयंडे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना केली. कोव्हीड रुग्णांसाठी वापरलेल्या वस्तूंची विल्हेवाटी अशा पद्धतीने होऊ लागल्याने आसपास राहणाऱ्या रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी निवासी विभागीय डोंबिवलीकरांकडून पुढे आली आहे.

संबंधित पोस्ट