सीईओंच्या मध्यस्थीनंतर उपाध्यक्ष निलेश सांबरे यांचे उपोषण मागे

पालघर (प्रतिनिधी/2 जुलै):  पालघर जिल्हा परिषदेकडे आलेला 203 कोटींचा निधी खर्च न करता परत शासन जमा झाल्याच्या निषेधार्थ व आपल्या अन्य मागण्यांसाठी पालघर जिल्हा परिषदेचे  उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर बुधवारी (1जुलै) उपोषण सुरू केले होते. याबाबत 31 जुलै पर्यंत हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या विकास कामासाठी शासन पातळीवरून आलेला तब्बल 203 कोटींचा निधी कुठलाही खर्च न करता शासनाकडे परत जमा करण्यात आला असून शासना कडून मिळालेल्या निधीचा नियोजनबद्धरित्या विकास आराखडा बनवून त्याचे वितरण करणे, तत्कालीन

जिल्हापरिषद पदाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यां कडून अपेक्षित असताना तसे करण्यात आले नसल्याचा निलेश सांबरे यांचा आरोप आहे. तर दुरुस्तीच्या किरकोळ कामात जिल्हा परिषदेच्या काही माजी पदाधिकाऱ्यांनी जास्त रस दाखविल्याने 203 कोटीच्या निधीच्या खर्चाबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरता आले नसल्याचा आरोपही निलेश सांबरे यांनी केला आहे..
तसेच काही वस्तीशाळा शिक्षकांना जिल्हा परिषदेत नियुक्ती देण्यात आल्याने उर्वरित शिक्षकांना नियुक्ती द्यावी, सन 2004 पासून अडकलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकरणासाठी जेष्ठ व आजारी कर्मचाऱ्यांना सतत जिल्हापरिषद कार्यालयात यावे लागत असल्याने सातव्या वेतन आयोगाच्या फरका सह त्यांना तात्काळ लाभ मिळावा, शिक्षण समिती मधील ठरावाप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी यांसह अन्य प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी 22 पत्रे जिल्हा परिषदेकडे पाठवली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, मात्र कार्यवाही होत नसल्याने त्यांनी उपोषण सुरू केले होते.
मात्र बुधवारी (1जुलै) सकाळी निलेश सांबरे यांनी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर काही वेळातच जि. प.  अध्यक्ष भारती कामडी, सभापती काशीनाथ चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, उपमुख्यकार्यकरी अधिकारी देशमुख, संघरत्ना खिल्लारे आदींनी उपाध्यक्षांची भेट घेतली व जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीतल्या चर्चेप्रमाणे जिल्हापरिषदे मार्फत कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येऊन संबंधित प्रश्न 31 जुलै पर्यंत मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन देण्यात आल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.

संबंधित पोस्ट