प्राचीन शिल्पकला, शिलालेख, स्तंभ, राजवाडे आणि स्थापत्य कला आज नामशेष होण्याच्या मार्गावर संवर्धन करण्याची गरज

बोरघर / माणगांव : बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय शौर्याचा आणि विश्वरत्न बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील तत्कालीन विषमते विरुद्ध लढा देऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाजातील शोषित, पीडित अस्पृश्यतेने ग्रासलेल्या लोकांना माणुस म्हणून जगण्याचे अधिकार प्रदान करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड चवदार तळे या ठिकाणी २० मार्च १९२७ साली पिण्याच्या पाण्यासाठी जो पहिला सत्याग्रह केला. या जगप्रसिद्ध रक्तहीन क्रांती मुळे रायगड जिल्ह्याला जसे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 
तसेच माणगांव तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गावागावात आजही प्राचीन काळातील शिल्प कला आणि स्थापत्य कलेची आणि त्या काळातील प्राचीन मानवी संस्कृती ची साक्ष देणार्या प्राचीन वास्तू आणि अप्रतिम सुंदर कलाकृती, कलाकुसर दर्शविणार्या शिला आणि त्या वरील शिल्पकला माणगांव तालुक्यातील बोरघर, आमडोशी, पेण तर्फे तळे, आणि खरवली पंचक्रोशीतील सर्व गावागावात शेवटच्या घटका मोजत असलेल्या दिसून येत आहेत. या मध्ये प्रामुख्याने बोरघर गावातील तत्कालीन प्राचीन ऐतिहासिक जमीन महसूल खात्याच्या जुलमी खोती पद्धतीची साक्ष देण्यासाठी अत्यंत जीर्ण अवस्थेत मोडकळीस येवून सुद्धा आजही ताठ मानेने उभी असलेली केवळ दगड, माती,वीटा आणि सागवान लाकूड वापरून सुंदर कलाकुसर व प्राचीन वास्तू कलेचा उत्तम नमुना असलेली   दुमजली लाकडी इमारत अर्थात स्थानिक भाषेतील माडी, फड आणि माजघर, हनुमान मंदिर, सोमजाई मंदिर तर आमडोशी व पेण तळे गावातील प्राचीन दगडी वास्तू, व देवदेवतांची मंदीरे आणि खरवली गावाची व संपूर्ण खरवली पंचक्रोशीची शान असलेल्या इतिहास प्रसिद्ध खंडोजी मानकरांचा ऐतिहासिक राजवाडा म्हणजे प्राचीन वास्तू कलेचा अप्रतिम नमुना आहे. आणि त्या सभोवतालची संरक्षक भव्य तटबंदी म्हणजे प्राचीन शिल्प स्थापत्य कलेचा एक अप्रतिम नमुना आहे. या शिवाय या गावातील प्राचीन मंदिरे आणि तलावा शेजारी असलेल्या प्राचीन समाध्या आणि त्यांचे सुंदर अप्रतिम घडीव चीरे व समाध्यांचे उत्तम बांधकाम मनाला भुरळ घालतात आणि त्यांच्या भव्यतेची साक्ष देतात. या सर्व प्राचीन वास्तू, जीर्ण मंदिरे , राजवाडे, शिल्प आणि शिलालेख, स्तंभ आणि समाध्या यांना सुद्धा एक प्राचीन इतिहास आहे. ती आपली विरासत असून आपल्या प्राचीन संस्कृतीचा अनमोल ठेवा व ऐतिहासिक वारसा आहे. त्याचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. 
 या सर्व ऐतिहासिक वास्तू, शिलालेख, स्तंभ, प्राचीन मंदिरे, राजवाडे आणि ऐतिहासिक महान व्यक्तींच्या समाध्या या मागचा प्राचीन इतिहास आणि त्यांचे प्राचीन ऐतिहासिक महत्त्व जाणून घेण्यासाठी आणि हा अनमोल प्राचीन ऐतिहासिक वारसा आपल्या पुढील पिढी साठी प्रेरणादायी ठरण्यासाठी त्याचे ऐतिहासिक संदर्भासहित नीट काळजी पूर्वक संवर्धन केले गेले पाहिजे.

संबंधित पोस्ट