दाभोलकर हत्या: अरबी समुद्राच्या तळातून शोधलं पिस्तूल ?

मुंबई (प्रतिनिधी) : अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला मोठं यश मिळालं आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल सीबीआयच्या हाती लागलं असल्याची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं आहे. या पिस्तुलाची सध्या पाहणी केली जात आहे. यानंतरच आरोपींनी हे पिस्तूल वापरलं होतं की नाही हे स्पष्ट होईल. नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी गोळी घालून हत्या केली होती.
हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरले होते का ? याचा तपास सध्या सीबीआय करत असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सीबीआयने २०१९ रोजी पुणे कोर्टात ठाण्यामधील खारेगाव खाडीत हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घ्यायचा असल्याचं सांगितलं होतं. “अनेक दिवस शोध घेतल्यानंतर आम्हाला पिस्तूल सापडलं आहे. शवविच्छेदन अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे बॅलिस्टिक तज्ञ पिस्तुलाची पाहणी करणार आहेत,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.
पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मदत करणाऱ्या दुबई स्थित एन्विटेक मरीन कन्सल्टंटने नॉर्वेमधून यंत्रसामग्री मागवली होती. पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी तज्ञांकडून लोहचुंबकाचा वापर करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत खारेगाव येथील सर्व परिसराची छाननी करण्यात आली. या ऑपरेशनसाठी सीबीआयकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. राज्य सरकारकडून परवानगी घेण्यापासून ते पर्यावरण खात्याकडून मंजुरीपासून सगळी तयारी त्यांनी केली होती. नॉर्वेमधून यंत्रसामग्री आणण्यासाठी ९५ लाखांचा सीमाशुल्क त्यांना माफ करण्यात आला.
पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी आखण्यात आलेल्या या मोहिमेसाठी एकूण ७.५ कोटींचा खर्च आला. या केसचा निकाल लागावा यासाठी सीबीआय सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. दरम्यान, सध्या या पिस्तुलाची पाहणी केली जात असून यानंतरच हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आलं होतं की नव्हतं हे स्पष्ट होईल.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट