अस्थिर पर्वाची सुरुवात

विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यापासून महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या पाहता महाराष्ट्रात आता भलेही युतीचे सरकार आले तरी ते स्थिर नसेल आणि आघाडीच्या पाठींब्यावर जरी शिवसेनेने सत्ता मिळवली तरी तेही सरकार स्थिर नसेल. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीने महाराष्ट्रात अस्थिरतेच्या एक नव्या पर्वाला सुरवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही आणि   दुस-या  पक्षाच्या पाठींब्यावर सरकार चालवणे किती अवघड असते हे यूपीए सरकारच्या कालखंडात जनतेने पाहिले आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील सध्याच्या अवघडल्या राजकीय परिस्थितीबाबत चिंता वाटायला लागली आहे आणि या परिस्थितीला जर जबाबदार कोण असेल तर अर्थातच भाजप कारण विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपाची मस्ती उतरवून त्यांचे दोनशे पारचे स्वप्न धुळीस मिळवले आणि त्यांना फक्त १०५ जागा दिल्या. तरीसुद्धा सत्तेची हाव बाळगणे आणि मीच मुख्यमंत्री होणार अशा वल्गना करणे हे फडणवीसांच्या राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. याउलट राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला आहे  त्यामुळे आम्ही विरोधी पक्षातच बसणार त्यांची ही भूमिका अत्यंत रास्त आहे. राहता राहिला प्रश्न शिवसेनेचा तर शिवसेनेने युतीचा धर्म पाळून भाजपा बरोबर सत्ता स्थापन करायची तयारी दर्शवली आहे फक्त त्यांचे एवढेच म्हणणे आहे की भाजपने पूर्वी जी फिफ्टी फिफ्टी ची कमिटमेंट केली होती ती पाळावी, पण भाजपवाल्यांनी आता कोलांटी मारली आहे. म्हणे आम्ही अशी कोणतीही कमिटमेंट केली नव्हती ज्याप्रमाणे भाजपवाल्यांनी महायुती मधील छोट्या पक्षांना १८ जागा देतो असे सांगून त्यांची १४ जागांवर बोळवण करून त्यांना फसवले तसे शिवसेनेलाही फसवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे अशी फसवाफसवी करणाऱ्या पक्षाला इतरांनी एकत्र येऊन सतेपासून दूर ठेवायला हवे आणि सध्या तसाच प्रयत्न सुरू आहे पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर सत्तेत आलेले शिवसेनेचे सरकार फार काळ टिकणार नाही. कारण दोघांच्याही विचारसरणीत जमीन आसमानचे अंतर आहे. शिवाय हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना कदापि तडजोड करणार नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादीवाले सेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला जुमाणणार नाहीत शिवाय राष्ट्रवादीचे अनेक नेते वेगवेगळ्या घोटाळ्यात अडकले आहेत त्यांची चौकशीही सरकारला करता येणार नाही त्यामुळे आघाडीच्या पाठींब्यावर जरी शिवसेनेने सरकार स्थापन केले तरी ते फार काळ टिकणार नाही. त्यानंतर समजा पुढील दोनचार दिवसात सेनाभजपात समझोता झाला तरी तेही सरकार फार काळ टिकणार नाही. उलट २०१४ पासून २०१९ पर्यंत युती सरकार चालवताना ज्या अडचणींचा सामना मुख्यमंत्र्यांना करावा लागला होता त्याच्या पेक्षा दुप्पट अडचणींचा सामना यावेळी मुख्यमंत्र्यांना करावा लागेल. कारण निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ज्या पद्धतीने सेना भाजपने एकमेकांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला त्याचा राग दोघांच्याही मनात आहे. शिवाय सरकार बनवताना जी तडजोड होईल त्यात दोघांपैकी एकाला नमते घ्यावे लागणार आहे, उदारणार्थ भाजपने मुख्यमंत्रीपदावरचा  हक्क सोडला तर ती खंत त्यांच्या मनात राहणारच आहे त्यामुळे ते सुखासुखी शिवसेनेच्या मंत्र्याला सरकार चालवू देणार नाहीत आणि जर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद किंवा मनासारखी खाती मिळाली नाहीत तर शिवसेना भाजपच्या मुख्यमंत्र्याला हैराण करण्याची एकही संधी सोडणार नाही त्यामुळे युतीचे सरकार आले तरी त्यांच्यातील कलह कायम राहून एखाद्यावेळी संघर्षाची ठिणगी पडली की कोणत्याही क्षणी सरकार कोसळू शकते त्यातच शिवसेनेचे एक नंबरचे शत्रू नारायण राणे यांना भाजपात घेऊन भाजपने सेनेचा राग ओढवून घेतला आहे अशा स्थितीत दोघांचेही पटणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातली अस्थिर राजकीय परिस्थिती भविष्यात महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीचे संकट ओढवून घेऊ शकते.
मात्र यावर सध्या तरी काहीच उपाय नाही कारण जनतेने भाजपला नाकारताना शिवसेना भाजप युतीला मात्र स्पष्ट बहुमत दिले आहे. अशावेळी जनादेशाचा आदर करून यापूर्वीच युतीने सरकार स्थापन करायला हवे होते पण दोघांमध्ये सत्तेच्या वाटणीवरून जो काही बेबनाव निर्माण झालाय त्याने महाराष्ट्राला अस्थिरतेच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे आणि कुणाचेही सरकार आलेले तरी पुढील पाच वर्षात अस्थिरतेची ही कोंडी फुटणे अशक्य आहे. महाराष्ट्राची सध्याची आर्थिक स्थिती पाहता खरे तर महाराष्ट्राला एक स्थिर सरकारची गरज होती पण सेना भाजपातील बेबनाव महाराष्ट्राच्या मुळावर आला आहे आणि महाराष्ट्रातील १२ कोटी जनता मात्र आपण किती चुकीचा निकाल लावला याबाबत पश्चाताप करीत आहे.

रिपोर्टर

  • Editor
    Editor

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट