शेतकऱ्याला वाली कोण

भारत हा कृषी प्रधान देश आहे कारण या देशातील ६५ टक्के जनता ग्रामीण भागात राहते आणि शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे पण गेल्या काही वर्षांपासून निसर्गाने आपले रूपच पालटल्याने भारतात शेतीला पूरक असे वातावरणच राहिलेले नाही. पर्यावरणाची हानी आणि पृथ्वीचं वाढलेलं तापमान यामुळे वातावरणात असा काही बदल होऊ लागला आहे की कधी कधी उन्हाळा सुरू झाला तरी पाऊस पडत नाही आणि कधीकधी हिवाळा सुरू झाला तरी पाऊस थांबत नाही. पावसाची हीच अनियमितता शेतीच्या मुळावर आली आहे त्यातच सर्वत्र मोठ्या प्रमाणावर काँक्रेटीकरण होत असल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरायला जागाच शिल्लक राहिले नाही त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. पूर्वी जिथे १० फुटावर पाणी लागायचे तिथे आता १०० फूट खोदले तरी पाणी लागत नाही, बरे अतिवृष्टीत जे प्रचंड प्रमाणात पाणी उपलब्ध होते ते साठवण्याची पुरेशी यंत्रणाच नसल्याने लाखो क्यूसेस पाणी वाया जाते त्यामुळे अशा परिस्थितीत शेती व्यवसाय कसा टिकून राहील आणि या शेतीवरच अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे? नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेली पिके गेली. एकीकडे बँकांचे सावकारांचे कर्ज कडून दुबार तिबार पेरणी करायची आणि दुष्काळाने किंवा अतिवृष्टीने शेतीचे नुकसान होत असेल तर शेती करून काय उपयोग आणि ज्या शेतकरी कुटुंबातील मुलांनी आपल्या शेतकरी आईवडिलांची शेतीतील वाईट अवस्था पाहिलंय ती मुले कशाला शेती करतील? ती सरळ रोजगारासाठी मुंबई सारख्या शहरांकडे धाव घेत आहेत त्यामुळे शेतीचे काय होणार ? आज शेतकरी किती जरी अडचणीत असला तरी त्याने शेती व्यवसायात टिकून राहणे गरजेचे आहे कारण शेवटी शेतात धान्य तर पिकायला हवे कारण सगळ्याच लोकांनी शेतीकडे पाठ फिरवली तर खाणार काय? कारण १३० कोटी जनतेची भूक भागवू शकेल इतके अन्न धान्य परदेशातून आयात करणे शक्य नाही म्हणूनच काही झाले तरी शेती टिकून राहायला हवी आणि त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करायला हवी. केवळ शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन चालणार नाही तर शेतकरी कर्जबाजारी होणारच नाही यासाठी सरकारने ग्रामिंण भागात पर्यायी उद्योग धंदे सुरू करायला हवेत त्यामुळे एखाद्या कुटुंबातील चार माणसांपैकी दोघे शेती करत आहेत तर दोघांना नजीकच्याच कारखान्यात रोजगार मिळाला तर अशा स्थितीत जर एखाद्या वर्षी दुष्काळ पडला शेतात काही पिकले नाही तर कुटुंबातील जी दोन माणसे कारखान्यात काम करत आहेत ती कुटुंबाला हातभार लावू शकतात जेणेकरून दुष्काळात कोणावर उपाशी मरायची पाळी येणार नाही आणि सावकारांकडून कर्जही काढावं लागणार नाही. सरकारने अशा प्रकारे ग्रामीण भागात नियोजन केल्यास शेतकरी कर्जबाजारीही होणार नाही आणि त्याच्यावर आत्महत्या करण्याची पाळी ही येणार नाही पण दुर्दैवाने आजवर असे झाले नाही आणि त्याची कारणेही अनेक आहेत. सेना भाजप सारखे सत्ताधारी हे शहरी भागातले लोक आहेत त्यामुळे या लोकांना शेतीविषयी फारशी माहिती नाही किंवा ग्रामीण भागातील शेतीवर अवलंबून असलेल्या अर्थकारणाचा तितकासा अभ्यास नाही म्हणून त्यांना शेतकऱ्यांसाठी फार काही करता आले नाही. राहता राहिला प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा तर या दोन्ही ही पक्षातील बरेचसे नेते हे ग्रामीण भागातले आहेत आणि त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणही आहे पण त्यांच्याकडे इच्छाशक्ती नव्हती त्यामुळे १५ वर्ष राज्याची सत्ता असतानाही ते काही करू शकले नाहीत. परिणामी आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांची जी स्थिती होती ती युती सरकारच्या काळातही तशीच आहे. शेतीला  समांतर असा पर्याय निर्माण करण्यात महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना अपयश येणे हीच खरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची शोकांतिका आहे जोवर शेतकऱ्यांना त्यांच्या खेड्यापाड्यात शेती बरोबरच इतर रोजगार उपलब्ध होणार नाही तोवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुखदारिद्री संपणार नाही. बरे रोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भरपूर जागा उपलब्ध आहेत लाखो हेक्टर पडीक जमीन आहे जिथे शेती होत नाही किंवा अन्य कुठल्याही वापरात ती जमीन नाही अशा जमिनींवर छोटे छोटे लघुउद्योग सुरू करता येतील फक्त त्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. जर ग्रामीण भागात वीज, पाणी, चांगले रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर परकीय गुंतवणूकही येऊ शकते आणि कारखानदारीही उभी राहू शकते, शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळू शकते आणि खऱ्या अर्थाने शेतकरी सुखी होऊ शकतो. तेंव्हा लोकांच्या गरजा ओळखूनच सरकारने आज लोकांना जगवण्यासाठी जे करायला हवं त्यावरच पैसे खर्च करावा आणि लोकांच्या खास करून ग्रामीण भागातल्या जनतेच्या हाल अपेष्टा संपवाव्यात.

पुतळे आणि स्मारकांवर उधळपट्टी कशासाठी?
या देशातल्या ग्रामीण भागातील शेतकरी निसर्गाच्या प्रकोपामुळे आज भिकेला लागला आहे त्याची पोरेबळे उपाशी मरत आहेत, त्यांना जगवण्यासाठी सरकारने काहीतरी ठोस उपाययोजना करायला हवी, त्यासाठी पैसे खर्च करायला हवा पण त्याकडे दुर्लक्ष करून समुद्रात शिवाजी महाराजांचे हजारो कोटींचे स्मारक बांधून त्यातून काय साध्य होणार आहे. शिवप्रभु हे रयतेचे राजे होते त्यांनी रयतेच्या सुखासाठी सरकारी खजिन्यातला पैसा खर्च केला, रयतेच्या घरातील चुली पेटवण्यासाठी प्रसंगी शेतसारा माफ केला, रयतेच्या पैशावर रायगड किंवा इतर ३०० किल्ले उभारले नाहीत किंवा आपले आई वडील आणि नातेवाईकांची स्मारके बांधली नाहीत म्हणून शिवप्रभु आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या घरातील देव्हाऱ्यात आणि हृदयात आहेत त्यामुळे अशा युगपुरुषाच वेगळं स्मारक बांधण्याची गरजच काय आणि तेही शेतकरी संकटात असताना ! महाराष्ट्रावर ५ लाख कोटींचे कर्ज असताना! बाबासाहेबांच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे तर चालते बोलते ज्ञानपीठ होते आणि पुस्तक रूपाने त्यांचं ज्ञान भांडार आजही उपलब्ध आहे पण त्याकडे कुणी बघायला तयार नाही मात्र बाबासाहेबांचे पुतळे स्मारकासाठी आंदोलने होत आहेत. सरकारही स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे पण जे युग पुरुष लोकांच्या हृदयात आहेत त्यांच्या पुतळ्यावर आणि स्मरकांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्या पेक्ष्या तोच पैसा आज संकटात असलेल्या शेतकऱ्यांना जगवण्यासाठी खर्च करा त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खर्च करा तर त्यांच्याही आत्म्याला शांती मिळेल करण ते युग पुरुष आयुष्यभर उपेक्षितांसाठी झिजले उपेक्षितांसाठी त्यांनी हयात वाचली निदान याचे तरी पुतळे आणि स्मारके बांधणाऱ्यांनी ध्यान ठेवावे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट