'साहेब आपण करून दाखवलं', असे मातोश्रीबाहेर पोस्टर

राज्यातील सत्ता स्थापनेचा संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नसून सोमवारी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर सस्पेन्स निर्माण झाला आहे.

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षात भाजप-शिवसेना यांच्यातील तणाव दूर होण्याची चिन्हे दिसत नाहीत. यातच सोमवारी दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांनी ठाण मांडल्याने राज्यातील राजकारणात वेगळी समीकरणे जुळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोमवारी रात्रीच मातोश्रीबाहेर युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन करणारे पोस्टर लावण्यात आलं.

'साहेब आपण करून दाखवलंत' असं लिहलेल्या या पोस्टरवर आदित्य ठाकरे यांना 'माझा आमदार, माझा मुख्यमंत्री' असं संबोधलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात चर्चेला उधाण आलं आहे. शिवेसेनेनं 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम भूमिका घेतली असली तरी भाजप मात्र यासाठी तयार नाही. यामुळे युतीचं सरकार येईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मागण्यासाठी होती असं सांगितलं जातं. मात्र या भेटीत राज्यातल्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. शिवसेनेने जी भूमिका घेतली त्यावर अमित शहा नाराज असल्याचं भाजपच्या सूत्रांनी सांगितलंय. मुख्यमंत्रिपदावर कुठल्याही स्थितीत तडजोड करण्यास भाजपची तयारी नाही. अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर राज्यातल्या सत्ता समिकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे. राज्यातल्या नेत्यांशी चर्चा करून पुन्हा सोनिया गांधींना भेटणार असल्याचं शरद पवारांनी भेटीनंतरच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. त्यावेळी त्यांना तुम्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक आहात का? असा प्रश्न विचारला त्यावर पवारांनी नाही असं उत्तर दिलं. मात्र भाजप आणि शिवसेना यांच्यातले मतभेद वाढलेच तर महाराष्ट्रात मोठी राजकीय समिकरणं बदलण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.संबंधित पोस्ट