अंबड एमआयडीसीतील कंपनीला आरटीजीएसद्वारे 18 लाखांचा गंडा

नाशिक (प्रतिनिधी) :- अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या कार्यालयातून बँक ऑफ महाराष्ट्रच्या चेकबुकची चोरी करून त्यातील दोन चेकवर खातेदाराची खोटी सही करून व आरटीजीएस फॉर्मवर कंपनीचा शिक्का मारून अज्ञात भामट्याने 18 लाख 13 हजार 822 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या ठकबाजीची अधिक माहिती अशी, की कु. नेहा सुधीर म्हैसपूरकर (वय 31, रा. प्लॉट नंबर 14, बिल्डिंग नंबर 2, वंदना पार्क, बापू बंगल्याच्या मागे, इंदिरानगर) यांची अंबड एमआयडीसीत विजया कन्व्हर्टर नावाची कंपनी आहे. काल (दि. 31) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कंपनीच्या ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले बँक ऑफ महाराष्ट्रच्या चेकबुकची चोरी केली.
कंपनीच्या कार्यालयातून चोरी केलेल्या चेकबुकातील चेक क्रमांक 251924 व 251925 या दोन चेकवर म्हैसपूरकर यांची खोटी सही करून आरटीजीएस फॉर्मवर कंपनीचा शिक्का मारला. त्यानंतर भामट्याने बँक ऑफ महाराष्ट्र, अंबड शाखा सीसीसी अकाऊंट नंबर 60123605807 याच्यातून आरटीजीएसद्वारे सोरा ट्रेंड सोल्यूशन या नावाचे आयडीबीआय बँक निगडी शाखा अकाऊंट नंबर 008710200004349 या खात्यावर आरटीजीएसद्वारे 2 लाख 64 हजार 556 रुपये, तसेच पार्श्‍वनाथ प्रेस अपार्ट या नावाच्या कोटक महिंद्रा बँक, सुरेंद्रनगर, शाखा अकाऊंट नंबर 1612704126 या खात्यावर 15 लाख 49 हजार 326 रुपये असे एकूण 18 लाख 13 हजार 882 रुपये बेकायदेशीररीत्या ट्रान्स्फर करून नेहा म्हैसपूरकर यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस येताच नेहा म्हैसपूरकर यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेळके अधिक तपास करीत आहेत.

संबंधित पोस्ट