तांत्रिक संवर्गातील अधिकार्‍यांकडे सोपविलेल्या विभागीय अधिकारीपदाचा कार्यभार तत्काळ काढून घ्यावा : स्थायी सभापती

नाशिक (प्रतिनिधी) :- महापालिकेतील तांत्रिक संवर्गांतील अधिकार्‍यांकडे सोपविलेल्या विभागीय अधिकारी या पदाचा कार्यभार काढून घेण्यात यावा, तसेच प्रशासकीय संवर्गातील कामकाजाचा अनुभव असलेल्या अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक या पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना पदोन्नती देऊन विभागीय अधिकारीपदाचा कार्यभार सोपविण्यात यावा, अशी मागणी स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
महानगरपालिकेचे पश्‍चिम विभागाचे प्रभारी विभागीय अधिकारी व नाशिक पश्‍चिम विभाग पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अनिल सुकदेव नरसिंगे यांचे वयाच्या 45 व्या वर्षी हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या अतिरिक्त पदभारामुळे त्यांचे हृदयविकाराने निधन झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी तत्काळ दखल घेऊन आयुक्तांना निवेदन दिले आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सभापतींनी म्हटले आहे, की महापालिकेतील विभागीय अधिकारी हे पद प्रशासकीय संवर्गातील आहे. या पदावर नाशिक महापालिकेच्या तांत्रिक संवर्गातील अधिकार्‍यांच्या नेमणुका केल्या आहेत. तांत्रिक संवर्गातील अधिकार्‍यांकडे पूर्वीपासूनच प्रभागातील विविध कामकाजांचा मोठ्या प्रमाणावर व्याप आहे. त्यामध्ये मुख्यत्वेकरून पाणीपुरवठा, मलनिस्सारण, बांधकाम, तसेच विद्युत विभाग हे सर्व विभाग नागरिकांना पुरविण्यात येणार्‍या मूलभूत सोयीसुविधांमध्ये येतात. हे प्रश्‍न तत्काळ सुटणे महत्त्वाचे असते. यापैकी कुठलाही प्रश्‍न उपस्थित झाल्यास नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येतात. नेमके हे पद तांत्रिक अधिकार्‍यांकडे देण्यात आले आहे. तांत्रिक संवर्गातील अधिकार्‍यांकडे विभागीय अधिकारी या पदाचा कार्यभार सोपविल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या प्रभागातील त्याचा परिणाम विकास कामांवर होतो. विभागीय अधिकारी हे प्रशासकीय संवर्गातील पद असून, या पदाच्या कामकाजाचा तांत्रिक संवर्गातील अधिकार्‍यांना कोणत्याही प्रकारचा पूर्वानुभव नसल्याने त्या कामात दिरंगाई होते व अडचणी येतात.
महापालिकेत सद्य:स्थितीत विविध विभागांतील अभियंते, डॉक्टर, तसेच इतर विभागांतील विविध पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. विहित वयोमानानुसार अनेक अधिकारी व कर्मचारी हे सेवानिवृत्त झालेले असल्याने त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त झालेली आहेत. ही रिक्त पदे भरण्यात येत नसल्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर याचा परिणाम होत असून, एका अधिकार्‍याकडे दोन ते तीन पदांचा पदभार देण्यात आल्यामुळे अतिरिक्त कामकाजाचा बोजा पडत आहे. महापालिकेत रिक्त झालेली पदे लवकरात लवकर सरळसेवा भरती प्रक्रिया राबवून मनपाच्या सर्व संवर्गांतील रिक्त पदांचीय नियमानुसार भरती करण्यात यावी, तसेच तांत्रिक संवर्गांतील अधिकार्‍यांकडे सोपविलेला विभागीय अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात यावा, तसेच प्रशासकीय संवर्गातील कामकाजाचा अनुभव असलेल्या अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक या पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना तदर्थ पद्धतीने पदोन्नती देऊन विभागीय अधिकारीपदाचा कार्यभार सोपविण्याबाबत आपल्या स्तरावरून उचित निर्णय व्हावा, असेही उद्धव निमसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट