भाजपने नाकारल्यानंतर राष्ट्रवादीत, जनतेने नाकारल्यानंतर आता शिवसेनेत

नाशिक –  भाजपचे माजी आमदार, शहराध्यक्ष तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकिट कापल्यानंतर थेट भाजपाला आव्हान देत पुर्व विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत निवडणूक लढवणारे बाळासाहेब सानप यांनी पुन्हा राजकीय घुमजाव केले आहे.  निवडणूक निकालानंतर अवघ्या तीन दिवसांतच सानप यांनी मनगटाचे ‘घड्याळ’ उतरवून थेट मातोश्रीवर जाऊन मनगटावर शिवबंधन बांधले. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेतील सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणूक प्रचार कालावधीत सानप यांची खासदार संजय राऊत यांनी घेतलेली भेट लक्षवेधी ठरली होती. निवडणूक जाहीर झाल्यापासून पूर्व मतदारसंघात अनेक राजकीय घटना घडामोडी घडल्या. भाजपचे आमदार व शहराध्यक्ष असलेल्या बाळासाहेब सानप यांना पक्षाने उमेदवारी देऊ नये यासाठी सानप विरोधकांनी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, तर सानप समर्थकांनीही उमेदवारी मिळावी यासाठी शक्तिप्रदर्शन केले; परंतु पक्षाने अखेरच्या दिवसापर्यंत सानप यांना उमेदवारी दिली नाही, उलटपक्ष मनसेकडून इच्छुक असलेले राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज सानप यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधून उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढविली होती. सानप यांची उमेदवारी भाजपाने कापल्यानंतर पूर्व मतदारसंघात यंदा भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ सरळ दुरंगी लढत होत झाली. ढिकले यांना ८६ हजार ३०४ मते मिळाल्याने ते विजयी झाले तर सानप यांना ७४ हजार ३०४ मते मिळाली.
सानप यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे मनपातील राजकारनावर परिणाम असून महापौर पदासाठी शिवसेनेची ही खेळी असू शकते असा अंदाज राजकीय गोटात व्यक्त केला जात आहे

संबंधित पोस्ट