फसवणूक पर्व

भुलू नका कोणी, कमळीच्या वाद्याला
फसवले सद्याला, फसवले म्हाद्याला

कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा असतो हे उशिरा का होईना आता भाजपच्या मागे फरफटत जाणाऱ्या त्यांच्या मित्रांनाही कळले असेल आणि हे काही आजचे नाही १९९६ पासून सुरू आहे. एखाद्याच बोट धरून त्याच्या अंगणा पर्यंत पोहचायचे आणि त्याच्याशी गोडगोड बोलून त्याच्या चुलीपर्यंत शिरून नंतर त्याच्या घराचाच ताबा घ्यायचा हा बामणी कावा ज्यांच्या लक्षात येणार नाही त्यांची अवस्था सद्या आणि म्हाद्या सारखी होईल. राजकारण माणसाला खूप काही शिकवते फक्त त्याचा बारकाईने अभ्यास केल्यास कोण मित्र आणि कोण शत्रू  हे सहजपणे ओळखता येतं. पण सत्तेला चटावलेल्या काही लालची लोकांना फक्त वर्तमान काळ  दिसत असतो.  त्यामुळे भविष्यातील संकटाची चाहूल जरी लागली तरी ते दुर्लक्ष करतात आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या मित्राने गळा कापला की मग त्यांचे डोळे उघडतात. पण तो पर्यंत  खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे नशिबाला दोष देत अश्रू गाळीत राहण्यापलीकडे त्यांच्या कडे काहीच नसते. अशीच काहीशी अवस्था भाजपच्या छोट्या मित्रांची झाली आहे. छोट्या भावाच्या हातात मोठ्या खुबीने भाजपने बांगड्या भरल्या नंतर आता त्याच्या पेक्षाही छोटे भाऊ होते त्यांचे कपडेही काढून घेण्यात आले. त्यामुळे राजकारणात त्यांना कवडीचीही किंमत राहिलेली नाही. आतापर्यंत भाजपवाले जनतेला गाजर देत होते पण आता मित्रांच्या वाट्यालाही तेच आल्याने जानकर, सदाभाऊ, आठवले, मेटे हे सगळे प्रामाणिक मित्र ऐन निवडणुकीत कपाळाला हात  लावून बसलेत. 'जाये तो जाये कहा'  अशी त्यांची आज अवस्था  झाली आहे.  देशात युत्या आणि आघाड्यांचे पर्व सुरू झाल्या पासून छोट्या पक्षांची अशीच फसवणूक होते आहे. सत्तेसाठी त्यांचा वापर करून घ्यायचा आणि सतत मिळाल्यावर त्यांचा गळा कापायचे हेच धोरण मोठ्या पक्षांचे आहे. २०१४  पासून आठवले, जानकर, मेटे, राजू शेट्टी ही मंडळी भाजप सोबत होती पण म्हणावं तसं त्यांना काही मिळाले नाही. त्यामुळे सर्वात प्रथम राजू शेट्टी यांनी भाजपचा बामणी कावा ओळखून त्यांची साथ सोडली. पण त्यांचे सहकारी असलेले सदाभाऊ मात्र गुळाच्या ढेपेला लागलेल्या मुंगळ्या सारखे सत्तेला चिकटून राहिले. आठवलेंना केंद्रात आणि राज्यात कसेबसे एकएक मंत्रीपद मिळाले. महादेव जानकरांच्या डोक्यावरती मंत्रीपदाचा मुकुट चढला. पण मेटेंच्या हाती मात्र काहीच लागले नाही. आता प्रश्न असा येतो की सदाभाऊ आणि जानकर यांच्या सारख्या लोकांनी सत्ताधाऱ्यांना पाठींबा देताना त्यांच्या समाजाला त्यांनी जे आश्वासन दिले होते त्याचे काय? सदाभाऊंना मंत्रीपद मिळाले म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले का? आज कांद्याला निर्यातबंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सरकारच्या शंभर पिढ्यांचा उद्धार करतो आहे. आज टमाटे रस्त्यावर फेकून देण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली. कर्जमाफीचा जो तमाशा झाला तो शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. शेतकऱ्यांना पर्यायी उद्योग देण्यात सरकार अपयशी ठरल्याने दुष्काळग्रस्त भागातला शेतकरी सावकारी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. मग शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सदाभाऊ सत्तेत राहून फायदा काय? महादेव जानकर तर सरकारचे जावई असल्यासारखे वागत होते पण सरकारमध्ये पाच वर्षे राहूनही धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. धनगर मुलां-मुलींच्या वसतीगृहाचा प्रश्न लोंबकळत पडला आहे. धनगरांच्या विमासाठी सरकार कडून जो निधी मिळणार होता तोही मिळाला नाही. आणि आता तर जानकरांच्या तोंडावर अवघ्या दोन जागा फेकून त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला भाग पाडले जातं आहे. तेंव्हा आता कुठे जानकरांचे डोळे उघडले. आयला कुठली झक मारली आणि या बामणाच्या नादी लागलो. त्यापेक्षा धनगरवाड्यात होतो ते बरं होत किमान आपली इमानी माणसे तरी आपल्या सोबत होती असे आता त्यांना वाटतं आहे. आपल्याला भाजपने फसवलेय असं आता त्यांना वाटतं आहे, पण काय उपयोग कारण धनगर समाज केंव्हाच त्यांच्या पासून दूर गेला आहे. आज परिस्थिती अशी आहे की शेळ्या मेंढ्याही जानकरांच्या मागे नाहीत. तरी सुद्धा त्यांना भाजपची  साथ सोडवत नाही, हा लाचारीचा कळस आहे. पण जो भाजपची साथ सोबत करील त्याची हीच किंवा यापेक्षाही वाईट अवस्था होईल हेच काळाने भाजपच्या या छोट्या मित्रांना शिकवलं आहे. भाजपच्या खिशात असलेली ही लाचार मित्रांची यादी जोपर्यंत त्यांच्याकडे सुरक्षित आहे तोपर्यंत त्यांचे कोणीच वाकडे करू शकत नाही. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात शिवसेनेला तर फसवलच पण छोट्या मित्रांना १८  जागा देण्याचे गाजर दाखवून १४ जागा दिल्या आणि त्याही कमळाच्या तिकिटावर लढायची अट घालून म्हणजे त्या १४  जागाही भाजपने मोठ्या खुबीने लाटल्या. आणि स्वतःच्या पदरात १६४  जागा पाडून  घेतल्या. यालाच म्हणतात बामणी कावा. बिचारे छोटे मित्र या फसवणूक पर्वाची शिकार झाल्याने त्यांची अवस्था 'धोबी का कुत्ता घर का ना घाट का'  अशी झाली आहे.
सध्याचे राजकारण हे बेरजेचे राजकारण आहे. आणि या बेरजेचे राजकारणात फक्त आपल्याला काय मिळणार आहे आणि ते मिळवण्यासाठी काय करायला हवे याचा विचार केला जातो. त्यामुळेच तत्व, नितिमत्ता या गोष्टी खुंटीला लावून कुणाशीही कसलीही तडजोड स्वीकारावी लागते. तरच काहीतरी हाती लागते पण हे करतानाही कोण आपला आणि कोण परका  हे पारखण्याची ज्याच्यात क्षमता असते तोच यशस्वी होतो. मग तो छोटा असो की मोठा भाजपचेही एकेकाळी संसदेत फक्त २  खासदार होते. आज दोनाचे तीनशे झालेत. छोट्या पक्षांनी हेच लक्षात ठेवावे आणि आपली ताकद इतकी वाढवावी की कोणाही समोर त्यांना लाचारी पत्करावी लागणार नाही.

रिपोर्टर

  • Editor
    Editor

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट