सत्तेसाठी लाचारी

   शिवसेना ही ८०  टक्के समाजकारण आणि २०  टक्के राजकारणासाठी आहे असे म्हटले जायचे पण आता मात्र उलट परिस्थिती आहे. आताची शिवसेना ८० टक्के राजकारणासाठी आणि २०  टक्के समाजकारणा पूरती उरली आहे.  शिवसेनेतील हा बदल प्रत्येक  मराठी माणसाला अस्वस्थ करणारा आहे. कारण बाळासाहेबांच्या वेळी जी शिवसेना होती ती मराठी माणसाला वाघासारखं आणि स्वाभिमानाने जगायला शिकवणारी होती. मात्र आजची शिवसेना सत्तेसाठी इतकी लाचार बनली की सेनेची ही लाचारी बघून आज प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस शरमेने मान खाली घालतो आहे, खरोखरच सत्ता इतकी महत्वाची असते का? तसं असत तर बाळासाहेबांनी सुद्धा सत्तेसाठी काँग्रेस बरोबर समझोता केला असता. पण बाळासाहेबांना  सत्तेपेक्षा मराठी माणसाचा स्वाभिमान महत्वाचा  होता म्हणून त्यांनी सत्तेची आस कधी धरली नाही आणि सत्ता मिळाली तरी ती टिकवण्यासाठी मित्र पक्षासमोर कधी गुडघे टेकले नाही. म्हणून भाजप सारखा पाताळयंत्री मित्र बाळासाहेबांना वचकून होता. बाळासाहेबांच्या शब्दाबाहेर जाण्याची किंवा शिवसेनेकडे नजर उचलून बघण्याची भाजपवाल्यांना  हिम्मत झाली नाही. पण बाळासाहेबांच्या पश्चात भाजपने शिवसेनेला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आणि भाजपचा हा कुटील डाव शिवसैनिकांना जरी कळत असला तरी आजच्या शिवसेना नेतृत्वाला मात्र कळेनासा  झाला आहे.  त्यामुळे बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक आणि शिवसेनेवर मनापासून प्रेम करणारा मराठी माणूस हतबल आहे. आजच्या शिवसेना नेतृत्वाची बोटचेपी मवाळ भूमिका पाहता नजीकच्या काळात शिवसेना भाजपात विलीन तर होणार नाही ना? अशी भीती वाटायला लागली आहे.  यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजप समोर सुरवातीला फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठेवला होता. तो भाजपने धुडकावला, त्यानंतर १२६ जागा मागितल्या पण त्याही दिल्या नाहीत. आणि अखेरीस १२४  जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले. प्रत्येक वेळेस शिवसेनेला भाजपासमोर माघार घ्यावी लागली. मात्र या अपमानाचे सेना नेतृत्वाला काहीच वाटले नाही.  उलट भाजपची अडचण आम्ही समजून घेतली आणि सत्तेसाठी युती केली असा निर्लज्ज खुलासा सेना नेतृत्वाने केला.  सेना नेतृत्व जर इतके भाजपच्या आहारी गेलेले असेल तर बाळासाहेबांकडून वाघासारखं जगण्याची दीक्षा मिळालेल्या शिवसैनिकांनी शेळी होऊन जगायचं का ? आणि हा महाराष्ट्र भाजपला आंदण म्हणून देऊन टाकायच का? याचे उत्तर आजच्या सेना नेतृत्वाने द्यावे. उलट सेना नेतृत्वाने भाजपला निक्षून सांगायला हवे होते की आमची न्याय्य बाजू तुम्ही समजून घेणार नसाल तर तुमची अडचण आम्ही का समजून घ्यावी? पण आजच्या सेना नेतृत्वात तेवढी हिम्मत नाही.  म्हणूनच आता निष्ठावान शिवसैनिकांनी शेळी होऊन जगण्यापेक्षा बाळासाहेबांच्याच विचारांचा एक नवा जहाल पक्ष काढावा आणि भाजपवाल्यांना  त्यांची जागा दाखवून द्यावी. जे शिवसेनेतून फुटून गेले ते काही संपले नाहीत. राजकारणात आजही ताठ मानेने जगत आहेत. उलट ते ज्या ज्या पक्षात गेले तिथे त्यांनी पैसे ,मानसन्मान, जनाधार आणि सत्तेचा अधिकारही मिळवला. पण जे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते सेनेच्या  वेगवेगळ्या आंदोलनात झालेल्या खटल्यातूनही बाहेर पडलेले नाही. निष्ठावान शिवसैनिक केवळ भगवा झेंडा खांद्यावर घेऊन ठाकरे कुटुंबीयांचा चाकर म्हणून ते सांगतील तसा वागतोय, ते सांगतील त्या तडजोडी स्वीकारून अपमानाचे अश्रू गिळून जगायचं म्हणून जगतोय. त्याच्या वेदनांना मातोश्रीवर कवडीचीही किंमत राहिलेली नाही. आणि आता तर फडणवीस यांच्या सारख्या चतुर बामणांनी सेनेचा जवळपास ताबाच घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेतील मराठा आणि बहुजन समाज निर्णय प्रक्रियेतू बाहेर फेकला गेला आहे. शिवसैनिकांची ही शोकांतिका मराठी माणसाचे मन हेलावून टाकते. पण त्याला इलाज नाही कारण त्या काळात काही मराठ्यांना स्वराज्यपेक्षा मोघलांची वतनदारी अधिक महत्वाची वाटायची म्हणून ते आदिलशहा, निजामशहा,मोघल बादशहा यांनी फेकलेल्या वतनाच्या तुकड्यावर मराठी मातीशी बेईमानी करून वतनदार म्हणून जगत होते. शिवशाहीच्या त्या इतिहासाची आजच्या काळातही पुनरावृत्ती होते आहे. फरक इतकाच तेंव्हा वतनदारीची लालसा होती आता मंत्रीपदाची लालसा आहे. तेंव्हा शासनकर्ते मोघल होते आता भाजपवाले आहेत. मराठी माणसाचा दुर्दैव इतकाच की आज मराठी मातीसाठी रक्त सांडणारा कुणी शिवाजी राजा नाही. त्यामुळे शिवप्रभूंच्या या महाराष्ट्राचे काय  होणार कुणास ठाऊक?
मराठी माणसाने आज कुणाच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकावी तेच कळत नाही. मात्र काही झाले तरी मराठी माणूस गुजराती मारवाड्या समोर लाचारी पत्करणार नाही. शिवसेना नेतृत्व सत्तेसाठी लाचार होऊ शकते पण मराठी माणूस आपला स्वाभिमान कदापि कमळीच्या पायावर ठेवणार नाही. अरे मोघलांना इथून घालवले, इंग्रजांना गाशा गुंडालायला लावला. तिथे या जातीयवादी कमळीचे काय तिलाही सत्तेतून आज नाही तर  उद्या जावे लागेल. कारण  मराठी मनगटात दिल्लीचे तख्त हलवण्याची ताकद आहे. सगळ्याच मराठी माणसांची काही अँजिओप्लास्टी होऊन ते कमजोर झालेले नाहीत. अजूनही त्यांच्यात लढण्याची  आणि महाराष्ट्राला वाचवण्याची ताकद  आहे.

रिपोर्टर

  • Editor
    Editor

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट