अवे केम छो राज भाय

निवडणूक जिंकण्यासाठी माणूस कोणकोणती नाटके करतील याचा नेम नाही. पण निवडणुकीचा कालावधी हा जेमतेम महिनाभराचा असतो. पण त्यानंतर मात्र उर्वरित पाच वर्षे राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना लोकांमध्ये राहावं लागतं. त्यावेळी पक्षाची जी मूळ ध्येय धोरणे आहेत त्यापासून बाजूला होता येत नाहीत. कारण त्या पक्षाची तीच ध्येय धोरणे त्या पक्षाची ओळख बनलेली असते आणि म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या मूळ ध्येय धोरणांना अनुसरूनच प्रचार करावा लागतो. सध्या शिवसेना भाजपाची युती आहे. त्यामुळे शिवसेनेला गुजरातीची लागण झाली असावी. म्हणूनच आदित्य निवडणूक लढवीत असलेल्या वरळी विधानसभा मतदार संघात 'केम छो वरली'चे फ्लॅक्स झळकत आहेत. अशावेळी परप्रांतीयांच्या विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांच्याकडे मुंबईकरांचे आणि खास करून मुंबईतल्या मराठी माणसाचे लक्ष लागले आहे. गुजरात्यांनी मराठी माणसांच्या मुंबईवर जवळपास कब्जा केला आहे. त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की मराठी माणसाने काय खावे हे गुजराती शेठ लोक ठरवायला लागले आहे.  गुजराती लोकांच्या गृह निर्माण सोसायटीत मच्छी खाणाऱ्या मराठी माणसाला प्रवेश नाही. आणि बांधकाम व्यवसाय हा पूर्णपणे लोढा शेठ सारख्या धनाढय मारवाडी बांधकाम व्यावसायिकांच्या हातात गेल्याने त्यांनी बांधलेल्या इमारतींमध्ये मच्छी खाणाऱ्या मराठी माणसांना घर दिले जात नाही. मराठी माणूस हा इथला भूमिपुत्र असूनही त्याच्यावर अन्याय होत  आहे. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये तर मच्छी खाऊन जाणाऱ्याला प्रवेशच दिला जात नाही. तिथे मच्छी विकणाऱ्या आमच्या कोळी बांधवांना गुजराती मारवाड्यांच्या ताब्यात असलेली मीरा भाईंदर महापालिका त्रास देते आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणारा इथला मूळ मालक कोळी बांधव देशोधडीला लागलाय आणि या सर्व अन्यायाच्या विरोधात केवळ मनसेने आवाज उठवला होता. काही दिवसांपूर्वी ठाण्यात मराठी कुटुंबाला त्रास देणाऱ्या एका मुजोर गुजरात्याला मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर मराठी माणसाची माफी मागायला लावली होती. तसेच यापूर्वीही गुजरात्याच्या मुजोरीला मनसेने लगाम घालण्याचा प्रयत्न केला होता. अशावेळी शिवसेनेच्या मराठी उमेदवारानी वरळीत गुजरात्यांना खुश करण्यासाठी जे 'केम छो  वरली'चे फ्लॅक्स लावले आहे. त्याबाबत मनसे आणि राज ठाकरे यांची काय भूमिका असणार आहे याची मुंबईतल्या मराठी माणसाला उत्सुकता आहे. शिवसेनेचे सोडा कारण शिवसेना आता मराठी माणसाची राहिलेली नाही. शिवसेना भाजपच्या ताटाखालचे मांजर बनून आपला मराठी धर्म विसरली आहे. काही दिवसांनी उद्धव ठाकरेंनी शिवसेना भाजपात विलीन केली तरी कोणाला आश्चर्य वाटणार नाही. कारण सत्तेसाठी शिवसेना भाजपची बटीक बनली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आता मराठी माणसाला फारशा अपेक्षा नाहीत म्हणून तर वरळीत "कसं काय भाऊ" अशी मराठी माणसाला विचारणा करण्या ऐवजी "केम छो वरळी" म्हणून गुजरात्यांची विचारपूस केली जाते. पण राज ठाकरेंचे तसे नाही त्यांचा पक्ष सत्तेसाठी नव्हे तर सत्ता नसतानाही मराठी माणसांसाठी झुंजतोय. त्यामुळे परप्रांतीयांची पाठराखण करणाऱ्या आणि मराठी माणसांऐवजी गुजरात्यांची अगोदर विचारपूस करणाऱ्या शिवसेना उमेदवाराच्या विरोधात मनसेने उमेदवार उभा करायला हवा आणि प्रचारासाठी मराठीचाच मुद्दा घ्यायला हवा. म्हणजे मराठी माणसाशी कोण प्रमाणिक आहेत ते एकदा मुंबईकर मराठी माणसाला कळू द्या. पण इथे जर नातेसंबंध जपण्याचा मनसेने प्रयत्न केला तर मात्र मनसेकडून मराठी माणसाचा भ्रमनिरास होईल. म्हणूनच "अवे केम छो राज भाय" असा सवाल मराठी माणूस करतोय.
मराठी माणसाने कधीही गुजराती माणसावर कुठल्याच गोष्टीचा दबाव टाकला नाही. उलट त्यांना येथे व्यापार उद्योगाची संधी दिली.  त्यांच्या कामात हातभार लावला त्यांना बंधुभावाने वागवले पण आज तेच मराठी माणसाच्या मुळावर उठले आहेत. मराठी माणसाने काय खावे, कसे राहावे हे सांगण्याचा यांना कोणी अधिकार दिला आहे. आज मीरा भाईंदर महाराष्ट्रात आहे की गुजरात मध्ये तेच कळत नाही? पण मराठी माणसाच्या या वेदनांची कुणालाच पडलेली नाही. ज्या मराठी माणसांनी शिवसेनेला मोठे केले ती शिवसेना आज मराठी माणसा ऐवजी 'केम छो वरली' म्हणून गुजराती लोकांची विचारपूस करते आहे. मीरा भाईंदरमध्ये गुजरात्यांकडून तिथल्या मराठी माणसांच्या कोळी बांधवांच्या अधिकाराची गळचेपी होतेय आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी निर्माण झालेली शिवसेना हे सगळं भाजपच्या गळ्यात गळा घालून मुकाट्याने बघतेय. कुठे गेला सेनेचा मराठी बाणा सेनेकडे जरी आज मराठी बाणा नसला तरी मनसेकडे  आहे. म्हणूनच मराठी माणसांच्या वरळीत केम छो म्हणत गुजरात्यांची विचारपूस करणाऱ्या शिवसेने विरुद्ध मनसेची भूमिका रोखठोक आणि मराठी बाण्याला साजेशी अशीच असायला हवी. कारण समाज हा नात्यागोत्याच्या पलीकडे असतो त्यामुळे वरळीत मराठी बाणा टिकवण्यासाठी आणि तिथल्या परप्रांतीयांना मराठी माणसाची ताकद दाखवण्यासाठी 'केम छो' म्हणत गुजरात्यांची विचारपूस करणाऱ्यांना  धडा शिकवण्यासाठी मनसेने वरलीतून उमेदवार द्यायलाच हवा हीच मुंबईतील मराठी माणसाची इच्छा आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट