पॉलिश करण्याच्या बहाण्याने वृद्धेला ६० हजारांचा गंडा

नाशिक (प्रतिनिधी) :- तांब्याची लोटी व चांदीची अंगठी पॉलिश करून देऊन विश्‍वास संपादन केल्यानंतर सोन्याच्या पाटल्यांना पॉलिश करून त्या डब्यात ठेवल्या, असे सांगून दोघा ठकबाजाने हिरावाडीत वृद्धाला ६० हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी, की अरुंधती उदय शेफाळ (वय ६८, रा. प्लॉट नंबर १३, नीललक्ष्मी अपार्टमेंट, भगवतीनगर, हिरावाडी, पंचवटी) या वृद्धेकडे काल (दि. ३०) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास २० ते २२ वयोगटातील दोन भामटे आले. आम्ही भैया पावडर विकणारे असून, तुम्ही जर भैया पावडरचे दोन पॅक घेतले, तर तुम्हाला चारचाकी गाडीच्या चाकाची रिंग साफ करण्याचे लिक्विड मोफत देऊ, असे सांगून वृद्धाकडील तांब्याची लोटी व चांदीच्या अंगठीची पॉलिश करून देऊन त्यांचा विश्‍वास संपादन केला. लोटीला व अंगठीला पॉलिश झाल्याने वृद्धेचा विश्‍वास त्या दोघा भामट्यांवर बसला.
वृद्धेचा आपल्यावर विश्‍वास बसल्याचे पाहून भामटे आनंदून गेले. त्यांनी त्यांच्या हातातील ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या पाटल्यांना पॉलिश केले. त्या पाटल्या डब्यात ठेवल्या, असे सांगून हातचलाखीने डब्यात न ठेवता वृद्धेची फसवणूक केली. ते निघून गेल्यानंतर हा प्रकार वृद्धेच्या लक्षात आल्याने त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दोघा ठकबाजांविरुद्ध फिर्याद दिली असून, या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. आर. शेगर अधिक तपास करीत आहेत.

संबंधित पोस्ट