'शतप्रतिशत भाजप' शिवसेनेच्या मुळावर ..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय पिल्लू असलेल्या भाजपची भूमिका ही नेहमी बांडगुळासारखी राहिली आहे. बांडगूळ ही एक परजीवी वनस्पती आहे. जी झाडाच्या फांद्यांचा आधार घेत वाढते आणि नंतर सगळ्या फांद्यांना कवेत घेऊन मूळ झाडालाच संपवून स्वतः वृक्ष होऊ पहाते.
   लोकशाही मध्ये विरोधी पक्षाचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. कारण विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम करत असतो. मात्र  'शतप्रतिशत भाजप' या मोदी-शहांच्या संकल्पनेत विरोधी पक्ष नावाच्या संकल्पनेलाच स्थान नसल्यामुळे मोदी- शहांची 'काँग्रेस मुक्त भारता' सोबतच 'शतप्रतिशत भाजप'कडे, परिणामी हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु आहे. २०१४ च्या राक्षसी बहुमतानंतर भाजपकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मित्र पक्षांना संपविण्याचा पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु झाला. ज्या राज्यात भाजपला पुरेसं संख्याबळ नाही अशा राज्यात मित्रपक्षांच्या जीवावर उभे रहायचे आणि नंतर त्यांनाच  कवेत घेऊन त्यांचे अस्तित्व संपवायचे असा भाजपच्या रणनीतीचा भाग आहे आणि अनेक राज्यात त्यांची ही रणनीती यशस्वी होताना दिसत आहे. भाजपच्या विरुद्ध विचारसरणी असलेल्या 'पीडीपी' पक्षाला आणि कायम भाजप विरोधी राजकारण केलेल्या तेलगू देसम पक्षालाही सोबत घेऊन पद्धतशीर संपविण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.  
१९७५ साली इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली. समाजवादी, साम्यवादी आणि सगळ्या विरोधी पक्षांनी आणीबाणीला कडाडून विरोध केला. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन जनता पार्टीची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग असलेल्या जनसंघही जनता पार्टीत सामील झाला. आणीबाणी उठल्यानंतर १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व इंदिरा गांधींचा मोठा पराभव झाला. परंतु विरोधी विचारधारांना सोबत घेऊन मिळवलेली सत्ता फार काळ टिकली नाही आणि जनता पार्टीचे विघटन झाले. तो पर्यंत जनसंघाने बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या छायेखाली स्वतःची पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न सुरु केले होते. जनता पार्टीच्या विघटनानंतर  १९८० साली जनसंघाचे रूपांतर भारतीय जनता पार्टी नावाच्या नवीन पक्षात झाले.
१९८४ साली फक्त दोन खासदार असलेल्या भाजपची ताकद महाराष्ट्रात शून्य होती. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात हातपाय पसरविण्यासाठी भाजपला हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या एका प्रादेशिक पक्षाच्या आधाराची गरज होती. त्याचवेळी महाराष्ट्रात शिवसेनेचे वर्चस्व वाढत होते. बाळासाहेब ठाकरे सारखा एक प्रभावी नेता सत्ताधारी काँग्रेसला शिंगावर घेत होता. मराठी माणसाच्या कार्डावरून हिंदुत्वाचे राजकारण करणारे बाळासाहेब भाजपला जवळचे वाटले. शिवसेनेच्या रूपाने महाराष्ट्रात हातपाय पसरवायला भाजपला एक आधार मिळाला होता. भाजपचे तत्कालीन चाणक्य प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेची ताकद ओळखून शिवसेनेला मोठा भाऊ मानून युती घडवून आणली.
देशपातळीवर लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयीं सारख्या प्रभावी नेत्यांच्या नेतृत्वाखाली  भाजप जरी मुसंडी मारत असला तरी महाराष्ट्रात भाजपची भूमिका कायम लहान भावाचीच राहिली आणि ते अगदी बाळासाहेब ठाकरे हयात असे पर्यंत. युतीवर बाळासाहेबांचा वचक इतका होता की युती तुटण्याची भाषा झाली की स्वतः भाजपचे केंद्रीय नेते बाळासाहेबांची समजूत काढायला मातोश्रीवर लोटांगण घालीत. आता बाळासाहेब हे राहिले नाहीत आणि भाजपकडून मध्यस्थी करणारे प्रमोद महाजन आणि मुंडेही हयात नाहीत.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात भाजपला मोदींसारखा एक राक्षसी महत्वाकांक्षी असलेला एक नेता मिळाला. व्यापारी मनोवृत्ती असलेल्या मोदींनी थापेबाजीच्या जोरावर स्वतःची विकास पुरुष अशी एका आभासी प्रतिमा उभी केली. आणि मोदींच्या भूलथापांना सगळे काँग्रेस विरोधी पक्ष बळी पडले. मात्र ज्या पक्षांनी मोदींना समर्थन दिले त्यांना ही माहित नव्हते की आपण एका भस्मासुराला बळ देत आहोत. आणि सत्ता मिळवल्यानंतर हाच भस्मासुर सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवत सुटणार आहे. याचे महाराष्ट्रातीलच प्रमुख उदाहरण म्हणजे राज ठाकरे. मोदींना पाठींबा देऊन त्यांनी शिवसेनेचे मताधिक्य घटविले आणि अप्रत्यक्षपणे भाजपलाच मोठे केले. आता मनसेच्याच अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला आहे. 
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती फिस्कटली आणि भाजप शिवसेना वेगवेगळी लढली असली तरी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धोबीपछाड देत १२२ जागा निवडून आणल्या. अर्थात याला  मोदी लाट कारणीभूत होती. आणि ही आभासी मोदी लाट तयार करण्यात काँग्रेस विरोधी पक्ष ही तेवढेच कारणीभूत होते. मोदी लाटेतही शिवसेनेने चांगली कामगिरी करीत ६३ जागांवर विजय मिळवला असला तरी तो विजय मिळाला तो फक्त बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे. 'माझ्या उद्धवला सांभाळून घ्या' हे बाळासाहेबांचे शेवटच्या काळातले आर्जव शिवसैनिकांच्या आणि शिवसेनेला मानणाऱ्या मराठी माणसाच्या मनात घर करून गेले होते. त्यामुळे मोदी लाटेत ही मराठी माणूस शिवसेनेच्या सोबत ठामपणे उभा राहिला.
 'युद्धात जिंकले ते तहात हरले' या म्हणी प्रमाणे सत्तेसाठी शिवसेनेने भाजपशी पुन्हा युती केली. सत्तेसाठी केलेली युती ही बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांना रुचलेली नाही. युतीमुळे नाईलाजाने धनुष्यबाण सोडून कमळ साठी  प्रचार करावा लागतोय. यासाठी शिवसैनिकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यातच शिवसेना ही उद्धव चालवीत नसून त्यांच्या अवतीभवतीचे काही मोजकी टाळकी चालवत असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. 
त्यातच भाजपची महाराष्ट्रात वाढलेली ताकद ही शिवसेनेच्या जीवावर असल्यामुळे भाजपला मोठा भाऊ मानणे शिवसैनिकाला जड जात आहे. शिवसेनेच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना ही युती नको आहे. शिवसैनिकांमधील खदखदणाऱ्या असंतोषाची, अस्वस्थेतेची  उद्धव ठाकरेंनी वेळीच दखल घेणे आवश्यक आहे. सत्ता येवो न येवो कमळीच्या नादाला न लागता शिवसेनेने स्वबळावर लढणे आवश्यक आहे.  कारण संघर्षातूनच शिवसेना जन्माला आली आहे आणि संघर्षामुळेच शिवसेनेचे अस्तित्व टिकून राहणार आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या मवाळ भूमिकेमुळे शिवसेनेला मरगळ आली आहे. शिवसेनेत जनाधार असलेल्या नेत्यांचा एक मोठा गट कार्यरत आहे. जो सत्तेसाठी लाचार आहे. भाजपने त्यांच्यावर आधीच जाळे फेकून ठेवलेले आहे. जर हे मासे भाजपच्या गळाला लागले तर शिवसेनेला घरघर लागण्यास वेळ लागणार नाही आणि तेव्हा ही घरघर थांबविणे उद्धव ठाकरेंना कठीण जाईल... आणि भाजपची 'शतप्रतिशत भाजप' ही रणनीती महाराष्ट्रातही यशस्वी झालेली असेल.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट