मांजरपाड्याच्या पाण्यामुळे येवला तालुक्याच्या नावापुढे कायम दुष्काळी असलेला शब्द पुसला जाणार - छगन भुजबळ

नाशिक- येवला तालुका हा महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र येवल्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी पाहिलेले  मांजरपाड्याचे स्वप्न आज पूर्ण झाले असून मांजरपाड्याच्या पाण्यामुळे येवला तालुक्याच्या नावापुढे कायम दुष्काळी असलेला शब्द पुसला जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याचे आज येवला तालुक्याच्या हद्दीत कातरणी येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करत करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ,आ. पंकज भुजबळ, माजी आमदार शिरीष कोतवाल, अंबादास बनकर, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड,विष्णुपंत म्हैसधूने,पुणेगाव दरसवाडी कृती समितीचे संयोजक आप्पासाहेब कदम,विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई,परिषद सदस्य संजय बनकर, महेंद्र काले,पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, दिलीप खैरे, देविदास शेळके, नवनाथ काळे, गणपत कांदळकर,प्रकाश वाघ, भाऊसाहेब भवर, भाऊसाहेब बोचरे,लक्ष्मण कदम, विशाखा भुजबळ, डॉ.शेफाली भुजबळ, महिला शहराध्यक्षा अनिता भामरे,सोनाली कोटमे,राजश्री पहीलवान, अरुण थोरात, राधाकिसन सोनवणे, सचिन कळमकर, सुनील पैठणकर  आदी उपस्थित होते.

पुणेगाव दरसवाडी कालव्याच्या संदर्भात ४४ वर्षांपूर्वी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले मी त्यांचा मनापासून आभारी आहे.असे सांगून छगन भुजबळ म्हणाले की, माजी आमदार कै.जनार्दन पाटील यांनी रोजगार हमी कालव्याची निर्मिती केली. मात्र पुढे या कालव्याचे काम पुढे झाले नाही. त्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर याबाबत माहिती घेतली. यासाठी अनेक नागरिकांनी आंदोलने केले आणि घाम गाळला  होता. कायम दुष्काळी असलेल्या येवला तालुक्याच्या नावापुढील दुष्काळी शब्द पुसला गेला पाहिजे यासाठी हा प्रकल्प हाती घेतला असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की,दरसवाडी डोंगरगाव कालव्यावरील अनकाई येथील रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्न मार्गी लागला आहे तसेच किमी ४२ ते ६० बाळापूर ते हडपसावरगाव मधील अपूर्ण स्ट्रॅक्चर,भराव आणि खोदाई इत्यादी कामे पावसाळ्यानंतर लवकरच पूर्ण होतील.पुणेगाव कालव्याचा सुरवातीचा किमी ० ते२५ या अरुंद भागाचे विस्तारीकरण आणि इतर काही कामांच्या वर्क ऑर्डर झालेल्या असल्याने कालव्याची राहिलेली कामे यापुढील काळात मार्गी लावली जातील आणि या कालव्यातील त्रुटी दूर केल्या जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.यासाठी निधीची तरतूद देखील केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर कालवा नियोजित आणि संपूर्ण क्षमतेने प्रवाहित होण्यासाठी विस्तारीकरण व अस्तरीकरणासाठी २०० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या चौथ्या सुप्रमा मध्ये तो लवकरच मंजूर करून घेतला जाईल.

मांजरपाडा प्रकल्पाच्या मुख्य सांडव्याचे काम पावसानंतर लगेच सुरू होईल. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यात यापेक्षा तीनपट पाणी पूर्वेकडे वळवले जाईल, त्यावेळी कालव्याची अपूर्ण कामे पूर्ण होऊन या कालव्यातून नियोजित क्षमतेने पाणी येईल असे ते म्हणाले. आगामी काळात पार गोदावरी या नदीजोड प्रकल्पाचे पाणी याच बोगद्यातून गोदावरी खोऱ्यात आणले जाणार असल्याने नाशिक जिल्ह्याच नव्हे तर मराठवाड्यात सुध्दा हे पाणी जाणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते म्हणाले की, मांजरपाडा प्रकल्पामुळे पुणेगाव धरण भरले त्यानंतर हे पाणी पुढे ओझरखेड नंतर पालखेड धरणात सोडले. मांजरपाडामुळे पालखेड डावा कालव्याचे पाणी गेल्या अडीच महिन्यांपेक्षा अधिक काळापासून जिल्ह्यात सुरू आहे.  मांजरपाड्याचे पाणी तीन वर्षांपूर्वीच येवल्याला मिळाले असते मात्र आघाडी सरकारच्या काळात ७० कोटी रुपये ठेवले असतांना सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या नावाखाली सरकारने हे काम रखडून ठेवले होते. त्यासाठी कारागृहातूनसुद्दा पाठपुरावा केला. गुजरातला पाणी लिहून देऊ नका यासाठी सरकारकडे आपली बाजू मांडली. नार पारच्या पाण्यातून केवळ उत्तर महाराष्ट्र नाही तर मराठवाडा देखील सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कालव्यातील अडथळे दूर करण्यासाठी मोहन शेलार, दिलीप खैरे यांची सर्व टीम, शेतकरी बांधव यांच्यासह ज्यांनी ज्यांनी विशेष मेहनत घेतली त्या सर्वांचे छगन भुजबळ यांनी आभार मानले.

माजी आमदार शिरीष कोतवाल म्हणाले की, येवला तालुका आणि चांदवड तालुक्यासाठी आज सुवर्ण दिवस आहे. याआधी पुणेगाव धरणात पाणी येईल की नाही याबाबत नागरिक प्रश्न विचारत होते. मात्र छगन भुजबळ यांनी प्रकल्पाचे काम हाती घेतल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास होता. जे आपल्या ताटात नव्हते ते भुजबळांनी मिळवून दिले. अडीच वर्षे तुरुंगात असताना त्यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला असे हे भगीरथ नेतृत्व असल्याचे त्यानी सांगितले.

यावेळी अंबादास बनकर म्हणाले की, भगीरथाने गंगा वळवून आणली होती त्याचप्रमाणे भुजबळांनी गुजरातला वाहून जाणारे पाणी येवल्यात आणले आहे. येवल्याच्या इतिहासातील सुवर्ण क्षणाची नोंद झाली असून तालुक्यातील सर्व जनता याची साक्षीदार बनली आहे.

यावेळी अप्पासाहेब कदम म्हणाले की, कातरणीच्या शिवावर पाणी आले हा येथील नागरिकांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. अनेक जण पाणी येणार नाही असे सांगत होते मात्र छगन भुजबळ यांनी हाताशी घेतलेले काम पूर्ण केले. कदापी शक्य नसलेले काम त्यांनी शक्य करून दाखविले आहे. त्यामुळे तालुक्यातील जनता त्यांच्या कायम पाठीशी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मोहन शेलार म्हणाले की, तीन पिढ्यांचा दुष्काळ पाहिलेला भागातील शेतकरी गेल्या तीन दिवसात पाटाखालील बागायती शेतकरी बनले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी सधन होणार आहे. या कालव्याविषयी अनेक दंतकथा बनल्या होत्या पाणी येईल पाणी येईल यासाठी तालुक्यातील लोक वाट पाहत होते. याआधीच्या नेतृत्वाकडून पाणी मिळाले नाही. मात्र छगन भुजबळ यांनी मतदारसंघात आल्यानंतर या कालव्याला पाणी आणण्याचे वचन दिले होते. ते त्यांनी आज ते वचन पूर्ण केले असून येवल्याच्या वैभवात भर पडली आहे. त्यामुळे येथील शेतकरी स्वप्न पाहू लागला आहे.

यावेळी शेतकरी लक्ष्मण कदम यांनी मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की,या प्रकल्पात तीन पिढ्या जरी गेल्या असल्या तरी या पाण्यातून पुढील पिढीचे भविष्य सुधारणार आहे. पाणी आणि चारा नसल्याने हातची जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती.मात्र आता मांजरपाड्याचे पाणी आल्याने येथील पाण्याचा प्रश्न सुटला असल्याचे सांगून पाणीदार नेते छगन भुजबळ हा आपला पक्ष असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असे त्यानी यावेळी सांगितले.

पारंपरिक वाद्य वाजवत फटाक्यांची आतषबाजी करत छगन भुजबळ यांचे गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत

कातरणी ता. येवला येथील गावकऱ्यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे गावात पारंपरिक वाद्य वाजवत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात स्वागत केले. यावेळी नागरिकांनी कातरणी गावातून कालव्यापर्यंत फुलांनी सजविलेल्या वाहनातून भुजबळ यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी परिसरातील शेतकरी बांधवांनी वाद्याच्या तालावर ठेकाही धरला. समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ हेही त्यांच्या मध्ये सामील झाले. या दरम्यान तालुक्यातील  विविध गावागावातील शेतकऱ्यांनी भुजबळांचा सत्कार केलला. गेल्या ४४ वर्षानंतर गावात पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.कातरणी विखरणी इत्यादी गावांमध्ये यावेळी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या.

मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी येवल्याच्या दुष्काळी भागात पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून आज येवला तालुक्यात पोहोचल्याने तालुक्यातील तीन पिढ्यांचे ४४ वर्षांपासूनचे स्वप्न अखेर आज साकार झाल्याच्या भावना यावेळी नागरीक व्यक्त करत होते.
----------------------

संबंधित पोस्ट