पैशांचा पाऊस पाडण्यासाठी उसने घेतलेले पाच लाख रुपये परत फेडता न आल्याने आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी) :- पैशांचा पाऊस पाडण्यासाठी उसने घेतलेले पाच लाख रुपये परत न करता आल्याने मखमलाबाद येथील एकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी गोकुळ रघुनाथ माळेकर (वय 34, रा. स्वामी विवेकानंदनगर, गोविंद सावली रो-हाऊस नंबर 3, मखमलाबाद गाव शिवार) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांचे वडील रघुनाथ माळेकर यांना अनिल कांबळे, परदेशी, खेताडे, पेंटर व कांबळे यांचे सासरे अशा पाच जणांनी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. खर्चिक जडीबुटी व विधीसाठी हा खर्च येणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यांच्या भूलथापांना बळी पडत आपल्याला भरपूर पैसा कमावता येईल या लालसेपोटी माळेकर यांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवून जवळ पैसे नसताना उसनवारी करीत पाच लाख रुपये जमा केले.
पैशांचा पाऊस तर पडला नाहीच; परंतु त्या पाच जणांकडून पुन्हा पैसे मिळाले नाहीत. घेतलेले उसनवार पैसे परत करता येत नसल्याने माळेकर त्रस्त झाले. उसनवार घेतलेल्या पैशांचा तगादा सुरू झाल्याने अखेर या त्रासाला कंटाळून माळेकर यांनी शनिवारी (दि. 21) विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे अधिक तपास करीत आहेत.

संबंधित पोस्ट