अल्पवयीन मुलामुलींच्या पालकांचेही निर्भया पथकाने केले समुपदेशन

नाशिक (प्रतिनिधी) :- स्मार्ट फोनचा वापर, तसेच पालकांचे पाल्यांकडे होत असलेले दुर्लक्ष याचा फायदा उठवीत अल्पवयीन मुले-मुलेही प्रेमाच्या दुनियेत शिरकाव करीत असून, त्यातूनच त्यांची वाटचाल टवाळखोरीकडे होत आहे. ही बाब लक्षात घेऊन निर्भया पथक 4 च्या पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा गंधास यांनी एका महिन्यात 60 अल्पवयीन मुलामुलींचे समुपदेशन केले असून, त्यांच्या पालकांनाही याची जाणीव करून दिली आहे.नाशिकरोड भागातील शिखरेवाडी मैदान, मनपा शाळा क्रमांक 125 चे मैदान अथवा खंडोबा टेकडी या भागात सातत्याने काही टवाळखोर धिंगाणा घालत आहेत. ही बाब लक्षात घेऊन श्रद्धा गंधास यांनी भरकटत चाललेल्या या मुलामुलींना ताळ्यावर आणण्याचे काम निर्भया पथकाद्वारे सुरू केले आहे. गेल्या महिनाभरात निर्भया पथक 4 यांच्याकडून नाशिकरोड सह देवळाली परिसरात सुमारे विविध ठिकाणी जोडप्याने फिरणार्‍या व लज्जा निर्माण होईल असे वर्तन करणार्‍या जोडप्यांविरोधात सुमारे 60 कारवाया करण्यात आल्याची माहिती निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा गंधास यांनी दिली.
निर्भया पथक क्रमांक 4 ने 26 दिवसांत नाशिकरोडसह देवळाली भागातील विविध हॉटस्पॉटवर भेटी देत मुंबई पोलीस कायदा कलम 112/117 प्रमाणे 60 केसेस केल्या, तसेच 6 अल्पवयीन मुली या क्लास व कॉलेज सुटल्यानंतर घरी न जाता मुलांसोबत 125 मैदान बिटको कॉलेज परिसर, शिखरेवाडी मैदान, तसेच देवळालीतील खंडेराव टेकडी परिसरात या कारवाया केल्या. या चौकशीदरम्यान पथकाने जे अल्पवयीन आहेत, त्यांना संबंधित पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासमोर उभे करून त्यांच्या पालकांना बोलावून त्यांचे समुपदेशन करीत पालकांच्या ताब्यात दिले आहे, तर काही अल्पवयीन मुलींना त्यांच्या घरी सोडत पालकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्याकडून पुन्हा अशी हरकत करताना आढळून येणार नाही असा जबाबही लिहून घेण्यात येत असल्याबाबत त्यांनी माहिती दिली. या कारवायां दरम्यान निर्भया पथक 4 चे हवालदार जगदीश निकम, मनोहर सोळुंके, मोनाली ठाकरे, कैलास पवार आदींनी हे काम केले.

संबंधित पोस्ट