८० वर्षाचा तरुण योध्दा

माणसाचा आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर त्याच्या कर्तुत्वाला वयाची मर्यादाही रोखू शकत नाही आणि जे तरुणांना जमत नाही ते वयोवृद्ध लोक करून दाखवतात. कारण त्याच्याकडे प्रबळ आत्मविश्वास आणि दांडगा अनुभव असतो. आणि त्याच्याच जोरावर ते कुठल्याही क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची उतरवयातही छाप पाडू शकतात. सध्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाबतीतही तसेच म्हणावे लागेल. तब्बल ५ दशके महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या पवारांनी ५ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. तर केंद्रात अर्थ,संरक्षण,कृषी यासारखी अत्यंत महत्वाची खाती सांभाळली आहेत. केवळ सत्ताधारी पक्षात राहून त्यांनी विविध खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी तर संभाळलीच. पण काँग्रेस पक्ष सत्तेत नसताना त्यांनी लोकसभेत विरोधी पक्ष नेता म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी बजावली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जवळपास १३० वर्षांची प्रदीर्घ पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेसला आव्हान देऊन स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढण्याचे धाडसही दाखवले.  पवारांच्या पक्षाने पहिल्याच विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून काँग्रेस सोबत महाराष्ट्रात आघाडीचे सरकारही स्थापन केले. या सरकारने १५ वर्ष राज्य केले. मग इतके कर्तृत्व असलेल्या माणसासाठी राजकारणात काहीही अशक्य नाही. सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या पासून गणेश नाईक ,सचिन अहिर यांच्या सारखे निष्ठावान आमदार आणि उदयन राजेंसारखे खासदारही युतीकडे गेले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. पण पवार डगमगले नाहीत. वयाच्या ८० व्या वर्षी ते विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले आणि त्यांनी सत्ताधारी भाजपला आव्हान देत महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत होतेय. पवार हे शेतकरी नेते असल्याने ते ज्या ज्या भागात जात आहेत. त्या त्या भागातील शेतकरी शेतमजूर त्यांच्या समस्या पवारांना सांगतात कारण शेतकऱ्यांच्या समस्या शेतात राबलेला नेताच समजू शकतो. फडणवीस आणि उद्धव ठाकरे सारख्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या समस्या काय कळणार? त्यांनी फक्त शेती सिनेमात पाहिलीय, पुस्तकात वाचलीय पण कधी नांगर हातात धरण्याचा त्यांना योग आला नाही. कारण सेना भाजपवाले हे शहरी बाबू आहेत. हे लोक फारफार तर शहरात वडापाव किंवा चहाचा स्टॉल चालवू शकतात. पण चहासाठी लागणारी साखर आणि वडापाव साठी लागणारे बटाटे हे शेतीतून मिळतात आणि शेतीच ज्ञान या लोकांना नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्याही त्यांना कळत नाहीत. गेल्या पाच वर्षात याच गोष्टीची जाणीव शेतकऱ्यांना झाली आणि त्यांना पवारांची आवश्यकता भासू लागली. सध्या ग्रामीण भागात पवारांच्या सभांना किंवा रॅलींना जो प्रतिसाद मिळतोय तो याचमुळे! त्यातच मोदींनी लोकांना फसवल्याची भावना आजही लोकांमध्ये आहे. म्हणून तर मोदींनी सांगितलेल्या १५ लाखांचे काय  झाले असा सवाल लोक भाजपवाल्यांना विचारात आहेत. त्यामुळे लोकसभे प्रमाणे महाराष्ट्राच्या विधानसभेतही आपल्याला एकहाती सत्ता मिळेल असा जो भाजप नेत्यांचा दावा आहे. ते त्यांचे स्वप्नरंजन आहे. कारण महाराष्ट्रातली जनता यावेळी सेना भाजपला एकहाती सत्ता देण्याच्या मूडमध्ये नाही. शहरी भागात सेना भाजपला यश मिळेल. पण ग्रामीण भागातले चित्र मात्र वेगळे असेल. आज जे निवडणुकीचा कल सांगणारे कुडमुडे ज्योतिषी भाजपच्या बाजूने बोलत आहेत त्यांचे २४ ऑक्टोबर पर्यंत तोंड काळे झालेले असेल. कारण शरद पवारांनी ग्रामीण भागात सध्या असे काही वातावरण तयार केले आहे की शेतकऱ्यांचा दणका काय असतो तो यावेळी भाजपवाल्यांना दिसल्याशिवाय राहणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीत सहसा राष्ट्रीय प्रश्नांची चर्चा होत नसते.  पण भाजप अध्यक्ष मुंबईतही ३७० चे तुणतुणे वाजवून आपली पाठ थोपटून घेत होते. ठीक आहे केंद्राने ३७० कलम रद्द करून देशवासियांना काश्मीरचे दरवाजे उघडे करून दिले. हे त्यांचे काम नक्कीच चांगले आहे. पण विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी ती होत नाही. आज शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नाही,बँक कर्ज देत नाही, पीक विम्याचे पैसे मिळत नाही. सावकारी फास दिवसेंदिवस घट्ट आवळत चालल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. अशात त्याबद्दल बोलायचे सोडून कलम ३७०  आणि राम मंदिर हे दोनच विषय या लोकांसाठी महत्वाचे आहेत. म्हणूनच यावेळी महाराष्ट्रातील जनता बदल घडवणार आहे.

रिपोर्टर

  • Editor
    Editor

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट