एटीएम फोडणारे दोघे चोरटे पोलिसांच्या ताब्यात, तिघे पसार पहाटे पोलीस-चोरट्यांचे थरारनाट्य

नाशिक (प्रतिनिधी) :- सातपूर परिसरात एका बँकेचे एटीएम फोडणार्‍या दोघा चोरट्यांना सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी पंचवटीतील हिरावाडीतून ताब्यात घेतले; मात्र अंधाराचा फायदा घेऊन तिघे चोरटे पसार झाले आहेत. सातपूर-त्र्यंबक रोडवरील स्टेटस हॉटेलच्या मागे असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मशीनमध्ये असलेल्या पैशाचा बॉक्स पळवून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी आज पहाटे चार वाजता केला; परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला.

या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमुळे चोर सापडले आणि पैसे वाचले
सातपूर-त्र्यंबक रोडवरील स्टेटस हॉटेलच्या मागे खोडे पार्कजवळ आयसीआयसीआय बँकेचे एटीएम असून पहाटे चार वाजेच्या सुमारास पाच ते सहा जणांनी चारचाकी वाहनात येऊन लोखंडी रॉडच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यामध्ये असलेला बॉक्स काढून पळवून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र या ठिकाणी गस्त घालत असलेले बीट मार्शल त्वरित घटनास्थळी आले. पोलिसांना पाहताच चोरटे घाबरले व पैशाचा बॉक्स तेथेच टाकून देऊन पलायन केले. पोलिसांनी या चारचाकी वाहनाचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करीत असताना चोरट्यांनी शरद झोले व दीपक धोंगडे या बीट मार्शलनी पाठलाग केला असता या चोरट्यांनी या दोन्ही बीट मार्शलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोठ्या शिताफीने त्यांचा प्रतिकार करीत त्वरित कंट्रोल रूमला माहिती दिली. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत हिरावाडी येथे गाडी पकडली. त्यामधील दोन जणांना जेरबंद करण्यात आले. बाकी चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. याआधी ग्रामीण भागात त्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ निर्माण झाली असून, एटीमच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा उपस्थित होत आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी समीर शेख, सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास जाधव व बँक अधिकारी यांनी पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे.
एटीएम फोडण्याची घटना रस्त्याने ये-जा करणार्‍या काही जागरुक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली. संशयितांनी बोलेरो जीपमधून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी बोलेरो गाडीचा पाठलाग करून हिरावाडी रोडवरील विधातेनगरमध्ये पोलीस गाडी आडवी लावून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. अन्य तिघे मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्या दोघा संशयित आरोपींना सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, यापूर्वी शहरात झालेल्या एटीएम फोडण्याच्या काही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. या संशयित आरोपींकडून पोलिसांनी बोलेरो गाडी जप्त केली असून, तिचा क्रमांक एमएच 15 एएच 19 अशा दोन नंबर प्लेट असल्याचे उघडकीस आले आहे. ही बोलेरो गाडी चोरीची आहे की काय, याबाबतचा तपास सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी सातपूर येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र अचानक सायरन वाजल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला होता.
असे रंगले थरारनाट्य
सातपूर परिसरातून एटीएम फोडून पळ काढणार्‍या पाच संशयितांपैकी दोघांना पंचवटी पोलिसांनी हिरावाडी परिसरातील क्षीरसागर कॉलनीत सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. अमृतधामपासून हा पाठलाग सुरू होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या घटनेतील तिघे फरारी झाल्याने घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हिरावाडी परिसरात पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू असून, पोलीस विभागाचे सर्व अधिकारी डॉग स्कॉडसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पहाटे चार वाजेपासून हे थरारनाट्य सुरू होते. संशयितांकडे धारदार शस्त्रे असल्याची प्राथमिक माहिती असून, गेल्या काही दिवसांपासून शहरात एटीएम फोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही पहाटेची कारवाई पोलीस निरीक्षक के. डी. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चोपडे, पोलीस हवालदार जी. जे. पोटिंदे, योगेश सस्कर, अरुण हाडस, पवार, नरोडे आदींनी केली.

संबंधित पोस्ट