…आणि वाघाची झाली शेळी

छायाचित्र सौजन्य : http://dnasyndication.com वरून साभार

शिवसेनेने किती जरी आकांडतांडव केले तरी त्यांना भाजपच्या छत्र छायेचीच गरज आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले कारण युतीच्या जागावाटपाचा चर्चेत फिफ्टी फिफ्टी चा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेने १२६ जागांवर समाधान मानले आणि युतीतल्या जागावाटपाच्या वादा वर अखेर पडदा पडला. आता रविवारी अमित शहा मुंबई दौऱ्यावर आल्यावर युतीची अधिकृत घोषणा होईल. मात्र हा वाद सोडवताना उद्धव ठाकरे यांनी जे विधान केलेय ते निष्ठावान शिवसैनिकांच्या आणि शिवसेनेला मानणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हारी लागणारे आहे .उद्धव ठाकरे म्हणाले जे मिळेल त्यात समाधान मानू आणि लढू .शिवसेना इतकी लाचार होऊ शकते असे कधीच वाटले नव्हते . पण आज बाळासाहेब हयात नसल्याने शिवसेनेत सत्तेसाठी हापापलेला काही लालची नेत्यांमुळे उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली आहे. कारण भाजपच्या दबावापुढे झुकले नाही तर शिवसेनेतील काही मोठे सत्तापिपासू लालची नेते सेनेच्या काही आमदारांना घेऊन भाजपात जायच्या तयारीत होते. त्यामुळे शिवसेनेतील ही संभाव्य फूट टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंवर मिळेल त्यात समाधान मानण्याची पाळी आली आहे. आज बाळासाहेब हयात असते तर सत्तेसाठी सेनेशी गद्दारी करण्याची तयारी चालवलेल्या या विद्यमान खोपकरांची उद्धव ठाकरें याना ब्लॅकमेल करायची हिम्मत झाली नसती .पण हे फार काळ चालणार नाही शिवसैनिकांना कोण आपला आणि कोण गद्दार याची कल्पना आहे. त्यामुळे आज ना उद्या ते हिशोब चुकवतीलच पण आज भाजप समोर शिवसेनेला गुडघे टेकताना बघून प्रत्येक मराठी माणसाचे डोळे पाणावलेत. प्रत्येक मराठी माणसाला आज बाळासाहेबांची आठवण येतेय .भाजपचा महाराष्ट्रात नामोनिशाणही नव्हता. केवळ बाळासाहेबांच्या कृपेने इथे भाजप आली आणि त्यांनी बाळासाहेबांच्याच शिवसेनेसमोर आव्हान उभे केलेय आणि याच गोष्टीचे निष्ठावान शिवसैनिकांना आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या मराठी माणसाला वाईट वाटत आहे. इंग्रज ज्याप्रमाणे व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले आणि इथल्याच स्थानिकांना गुलाम बनवून त्यांनी १५० वर्ष या देशावर राज्य केले अगदी तसेच बाळासाहेबांचे बोट धरून महाराष्ट्रात आलेल्या आणि केवळ  हिंदुत्वाच्या मधाचे बोट दाखवून शिवसेनेच्या मदतीने इथे आपली पाळेमुळे घट्ट करणाऱ्या भाजपचे हिंदुत्व तरी विश्वसनीय आहे का ?बाबरी मस्जिद तोडल्यानंतर ज्यांनी बाबरीवर हातोडा चालवला त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे असे बाळासाहेब म्हणाले होते तर जो हुवा उसका मुझे बेहद्द अफसोस है असे अडवाणी म्हणाले होते. पण याच अडवाणींनी राममंदिरासाठी रथयात्रा काढली होती. मग बाबरी पडल्यावर अफसोस कशासाठी? शिवसेना आणि भाजपात हाच फरक आहे. शिवसेना जे काही करायची ते रोखठोक स्वतः मैदानात उतरून करायची. भाजपवाल्यांचे तसे नाही. त्यांना दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करायची सवय आहे .म्हणूनच त्यांनी आजवर महाराष्ट्रात शिवसेनेचा मजबूत खांदा वापरला आणि आज तोच खांदा ते तोडायला निघालेत. शिवसेना नेतृत्वाला भाजपची ही ब्रिटिश नीती कळायला हवी होती. पण आजचे सेने नेतृत्व कमजोर आहे. त्यामुळेच सेनेतील सत्तेसाठी लालची असलेल्या नेत्यांचे फावलेय. तर सामान्य पण निष्ठावान शिवसैनिक मात्र हळहळतोय. त्याच्या वेदना कधीतरी उद्धव ठाकरेंनी  समजून घ्याव्यात. लोकसभा निवडणुकीपासून आमचे ठरलंय आमचे ठरलंय असे उद्धव ठाकरे सांगत होते. शिवाय फिफ्टी फिफ्टी चाही आग्रह त्यांचाच होता. सेनेच्या मेळाव्यात सतेतील समान वाटा घेतल्या शिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले होते. शिवाय मुख्यमंत्री पदावरही शिवसेनेचा दावा होता. पण युद्धात जिंकण्याची सवय असलेली शिवसेना तहात मात्र हरली. त्यामुळे जरी युतीची सत्ता आली तरी मागील ५ वर्षा प्रमाणेच त्यांना सतेत उपेक्षितांप्रमाणे राहावे लागणार. पुन्हा त्याच कुरबुरी, तेच रुसवे फुगवे, तीच राजीनाम्याची नाटकं म्हणजे सत्तेत राहूनही समाधान नाही. त्यापेक्षा स्वबळावर जर निवडणूक लढवली असती तर किमान मानसन्मान तरी राहिला असता. पण ५ वर्ष भाजप सोबत फरफटत जाऊन काय मिळणार आहे . कारण मोदी हे एककल्ली हुकूमशहा आहेत. ते जिथे भाजपातील नेत्यांचे ऐकत नाहीत तिथे शिवसेनेचे काय ऐकणार? ते उद्धवना छोटा भाऊ म्हणाले होते. पण नाशिकच्या सभेत त्यांना या छोट्या भावाचा विसर पडला. त्यांनी सेनेचा उल्लेख ही केला नाही यातच सारे काही आले. मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी कडाडून हल्ला केला होता. आताही मोदी कोणताही एकतर्फी निर्णय घेऊ शकतात. उद्या त्यांनी मुंबई ऐवजी अहमदाबादला आर्थिक राजधानी केली तर त्यांना रोखण्याची उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत आहे का ?गुजराती माणसाने नेहमीच पैशाच्या जोरावर मराठी माणसाला दबावा खाली ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि यापुढेही तेच होणार. आहे वाईट फक्त एकच गोष्टीचे वाटते आणि ते म्हणजे कधी काळी वाघासारखी जगणारी शिवसेना आता मात्र शेळी सारखी कमजोर झाली.

रिपोर्टर

  • Editor
    Editor

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट