योगामुळे सगळे रोग बरे होतात मग पतंजलीची औषधे कशासाठी? रामदेवबाबाची अशी ही बनवा बनवी

     दुनिया झुकती है मगर झुकानेवाला चाहीये ! मोदी सत्तेत आल्यापासून देशवासियांना अच्छे दिन आल्याचे कुठे दिसत नसले तरी देवा धर्माच्या नावाने दुकानदारी करणाऱ्यांना मात्र अच्छे दिन नक्कीच आलेत. परिणामी देवभोळ्या आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सहज फसवणे आणि तेही देवाचे नाव घेऊन फसवणे सहज शक्य झाले आहे. जे मोहमाये पासून दूर असतात जे भौतिक सुखांपासून अलिप्त असतात आणि धर्मातील चांगल्या शिकवणी आणि संस्कार जे समाजापर्यंत पोचवतात अशांना साधू म्हणायला हरकत नाही.पण जे अंगावर सोन्या चांदीचे दागिने घालून मिरवतात, बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्यांमधून फिरतात, ज्यांना रोज रात्री नव्या नव्या सुंदर बायांचा सहवास लागतो. अशा आसाराम बापू आणि राम रहीम सारख्या विलासी लोकांना साधू का म्हणायचे ? पण आज या देशात अशाच लोकांची चलती आहे. केवळ हिंदू धर्मातच नाही तर मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर धर्मातही अशा लोकांचा बोलबाला आहे. पण धर्म हा एक संवेदनशील मुद्दा असल्याने अशा साधू महात्म्यांविरुद्ध लोकांना उघडपणे बोलत येत नाही. पण या लोकांकडून सुरू असलेली फसवणूक आणखी किती दिवस सहन करायची? आपण सध्या विज्ञान युगात जगतोय. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवरच तपासून बघायला हवी. ही वस्तुस्थिती आजही कित्येक अंधश्रद्धाळू लोकांना मान्य नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या औषधापेक्षा भोंदू बाबांच्या जडीबुटी आणि अंगाऱ्या धुपाऱ्यांवर त्यांचा विश्वास आहे. मोदींच्या कार्यकाळात आणखी एक बाबा नावारूपाला आलाय तो म्हणजे रामदेव बाबा. योग शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक आहे. योगामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते हे सुद्धा खरे आहे आणि ते विज्ञानानेही मान्य केलंय. पण योगामुळे सगळे रोग बरे होतात. नियमित योगासने केल्याने माणसाला कुठलाही रोग होत नाही. हा जो रामदेव बाबांचा दावा आहे तो पटण्यासारखा नाही आणि जर तसे असेल तर रामदेवबाबाने पतंजली च्या औषधांचा बाजार का भरवलाय? आज सर्दी खोकला पासून ते कँसर सारख्या दुर्धर आजारापर्यंत सगळ्या रोगांवर पतंजलीची औषधे आहेत. एक कंडोम सोडला तर सगळं काही पतंजलीचेच उत्पादन आहे. कदाचित बाबा विवाहित असते तर मार्केट मध्ये पतंजलीचा  कंडोमही आला असता. आमच्या सारख्या लाखो सर्वसामान्य माणसांना फक्त एकच प्रश्न पडतो आणि तो म्हणजे जर योगामुळे रोग बरे होतात किंवा कुठलाही रोग होत नाही. तर मग रामदेव बाबांनी पतंजलीच्या औषधांचे उत्पादन कशासाठी सुरू केलाय आणि सरकारलाही या बाबींवर इतका विश्वास असेल तर मग आरोग्य सेवेवर सरकार कोट्यवधींचा खर्च का करतेय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नियमित योग करणारे लोकही हृदय विकाराच्या झटक्याने का मरतात. आज देशातील सरासरी ३५ टक्के कदाचित त्याहूनही अधिक लोकांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू होतोय. योगा करून आणि पतंजलीची औषधे खाऊनही त्यांचा हृदयरोग का बरा होत नाही याचे समर्पक उत्तर रामदेव बाबा आणि पतंजलीकडे नसले तरी लोकांकडे आहे. आज धावपळीच्या जीवनात पैशाच्या मागे धावणाऱ्या माणसाला वेळेवर जेवायला मिळत नाही. भूक लागली तर रस्त्यावरच्या चायनीज गाडीवरील पदार्थ किंवा उघड्यावरचे पदार्थ त्याला खावे लागतात. जे हानिकारक असतात कारण उघड्यावर तळलेल्या पदार्थांमधील वापरलेले तेल त्याच तेलाचा पुनः पुन्हा दुसरे पदार्थ बनवण्यासाठी वापर केला जातो. जे प्रकृतीला हानिकारक असते. शिवाय उघड्यावर खाद्य पदार्थ विकणाऱ्या गाड्या गलिच्छ परिसरात लावलेल्या असतात त्यामुळे उकिरड्यावरचे डास त्या पदार्थांवर बसतात आणि तेच पदार्थ आपण खाऊन रोगांना आमंत्रण देतो. आजकाल मुंबईसारख्या मोठ्या महानगरांमध्ये कित्येक महिलांना जेवण बनवण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे स्वीगी किंवा झोमॅटो मधून खाद्य पदार्थ मागवले जातात पण जिथे हे खाद्य पदार्थ बनवले जातात तिथल्या किचनच्या अवस्थेचा अनेक वेळा प्रसारमाध्यमांनी पर्दाफाश केला आहे.  हे बाहेरचे पदार्थ सुद्धा रोगाला आमंत्र देणारे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडची हवा प्रदूषित आहे. त्यात आरोग्याला हानिकारक असे अनेक केमिकल घटक मिक्स झालेत. जे वेगवेगळ्या कंपन्यांच्या उत्पादनाच्या वेळी बाहेर सोडले जातात तेच हवेत मिसळून हवा प्रदूषित करतात. पाण्याच्या बाबतीतही तोच प्रकार आहे. हवा पाणी, खाणे पिणे यात कुठल्याही प्रकारची शुद्धता नसल्याने माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाने ग्रासलेय. त्यात काही लोकांना दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन असते. त्यामुळेही रोग होतात मग अशा परिस्थितीत योगामुळे रोग होणारच नाहीत असे रामदेव बाबा कसे सांगतात ? आणि पतंजलीच्याच औषधाने माणसाला गुण येईल असा का दावा करतात. पहिली गोष्ट म्हणजे योग्य जर शारीरिक दृष्ट्या इतका लाभदायक आणि तंदुरुस्तीसाठी रामबाण असेल तर बाबांनी पतंजलीची हा बाजार बंद करायला हवा पण ते तसे करणार नाहीत. कारण नियमित योग्य करणाऱ्यांनाही रोग होतो म्हणून तर बाबांनी पतंजलीच्या औषधांचे मार्केट सुरू केली. ज्याचा आज कोट्यवधींचा व्यवसाय आहे आणि औषधांचे संपूर्ण मार्केट बाबांच्या पतंजलीनें काबीज केले आहे पण बाबांची ही आयुर्वेदिक औषधे फारशी परिणामकारक नाहीत हे पतंजलीची मुख्य पार्टनर असलेल्या बाळकृष्ण याच्या आजारपणा वरून सिद्ध झालंय. बाळकृष्ण हा रामदेव बाबांचा चेला आहे म्हणजेच तो नियमित योग करीत असणार. तरी ही त्याला कुठला तरी मोठा आजार झाला असून  त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावे लागले आहे. आजारपणात त्याने आपल्याच कंपनीची औषधे घेतली नसतील असे नाही. पण त्या औषधाने त्याला आराम पडला नाही म्हणून तर त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होऊन डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यावी लागली. डॉक्टरांनी दिलेली एलोपेथिक औषधे खावी लागत आहेत. इथेच बाबांच्या पतंजलीच्या औषधांच्या गुणवत्तेचा पर्दाफाश झाला आहे. तेंव्हा मोदींच्या पाठींब्याने भगवी वस्त्रे घालून बाबांनी किती जरी लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना या बाबाचे खरे रूप आता समजले आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट