शत प्रतिशत भाजपसाठी मुख्यमंत्र्यांचा छुपा अजेंडा, शिवसेनेचे मतदारसंघच महाजनादेश यात्रेचे टार्गेट

मुंबई-आगामी विधानसभा निवडणूक भाजपने स्वबळावर लढवावी असे बहुसंख्य भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यासाठीच महाराष्ट्रात शत प्रतिशत भाजप हा अजेंडा अत्यंत छुप्या पद्धतीने राबवला जात आहे .आणि याच अजेंड्याचा एक भाग म्हणून पद्धतशीरपणे शिवसेनेच्या मतदार संघात भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत शिवसेनेचे मतदार संघचं टार्गेट असतील असे बोलले जातेय आणि तसे असेल तर निवडणुकीच्या तोंडावर सेना भाजपातील संघर्ष अटळ आहे.
शिवसेना भाजपची युती होणार असे जरी मुख्यमंत्री ओरडून सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र पडद्यामागे वेगळ्याच हालचाली सुरू झालेल्या आहेत. मुख्य मंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेपूर्वी आदित्य ठाकरेंनी काढलेली जनाशीर्वाद यात्रा भाजप नेत्यांना आवडलेली नाही कारण आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत शिवसेनेत एकमत झाले आहे. तर भाजपवाले मात्र शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाहीत. त्यातच भाजपला महाराष्ट्रात शत प्रतिशत भाजप हा अजेंडा राबवायचा आहे. त्यासाठी शिवसेना कमजोर होणे आणि शिवसेनेचे मतदारसंघ भाजपकडे वळवणे आवश्यक आहे. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत शिवसेनेच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या ज्या ग्रामीण भागात शिवसेनेचे वर्चस्व आहे तिथे भाजपची ताकद वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत आणि महाजनादेश यंत्राच्या माध्यमातून शिवसेनेच्या मतदार संघांमध्ये जास्तीत जास्त सभा चौकसभा घेतल्या जाणार आहे. भाजपची ही रणनीती हळूहळू शिवसेनेच्या लक्षात येऊ लागताच दोघांमधील वाद वाढून जागा वाटपाच्या निमित्ताने एकमेकांवर कुरघोडी केल्या जातील आणि संघर्षाची ठिणगी पडून युतीमध्ये बेबनाव होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट