मुथूट गोळीबार : रामशेज किल्ल्याजवळ हेल्मेटसह आढळल्या दरोडेखोरांच्या ‘पल्सर-२२०’ ...हल्लेखोरांनी नाकाबंदीत सुमारे २० किलोमीटरचे अंतर दुचाकीवरून कसे कापले?या बाबत शहरात चर्चा सुरू आहे

उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात लुटीच्या इराद्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता सहा सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून बेछुट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गुन्ह्यात वापरलेल्या पल्सर-२२०प्रकारच्या तीन दुचाकी रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी शनिवारी (दि.१५) पोलिसांना आढळून आल्या आहेत. या दुचाकींच्या क्रमांकावरून या गुन्ह्याच्या तपासाला आता पोलीस गती देऊ शकणार आहे; मात्र तीनही पल्सरसोबत हेल्मेटदेखील पोलिसांना मिळून आल्याने हल्लेखोर शहराच्या नाकाबंदीमधून हेल्मेटसक्तीचा फायदा घेत वेशीबाहेर पोहचल्याचे चर्चा आहे.
शहराची कायदासुव्यवस्था  कमालीची ढासळली आहे. रहिवाशांची वाहने लक्ष्य करून समाजकंटक धुडगूस घालण्यापासून तर थेट पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे खाकीवरील नाशिककरांचा ‘विश्वास’ कमी होऊ लागला असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे  वातावरण पसरले आहे. शुक्रवारी गुंडांच्या गोळीबाराच्या घटनेने अवघे शहर हादरून गेले आणि पोलिसांची कायदासुव्यवस्था चव्हाट्यावर आली. या गुन्ह्यात फायनान्सचा निष्पाप तरुण कर्मचाऱ्याचा बळी गेला. हल्लेखोरांनी एक दोन नव्हे तर तब्बल पाच गोळ्या त्याच्या शरीरात झाडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दिवसाच्या सुरुवातीला गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या धाडसी दरोड्याच्या प्रयत्नाच्या घटनेने पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले. शहराच्या कायदासुव्यवस्थेचे तीनतेरा झाल्याचे यावरून उघड झाले. विशेष म्हणजे गुरुवारच्या रात्री पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन, मिशन आॅल आउट सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबविले होते. तरीदेखील शुक्रवारी सशस्त्र दरोडा टाकण्याचा भरवस्तीत प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांची नाकेबंदी, झडतीसत्र, सीमाबंदीसाठी तपासणी नाके रात्रीची गस्त पथके ही केवळ कागदावरच आहे की काय? असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित होत आहे.
 पोलिसांच्या तावडीतून दरोडेखोरे सहजरीत्या निसटले. हल्ल्याची माहिती मिळताच सर्व शहरात तसेच जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश दिले गेले आणि नाकाबंदी वाढविली गेली. 17 तपासपथके रवाना झाली; मात्र हाती काहीही लागले नाही. हल्लेखोरांनी रामशेजजवळ गुन्ह्यात वापरलेल्या दुचाक्या सोडून पोबारा केला. यावरून पोलिसांच्या नाकाबंदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण नाकाबंदी असतानाही उंटवाडी ते रामशेजपर्यंत सुमारे २० किलोमीटरचे अंतर हल्लेखोरांनी दुचाकीवरून कसे कापले? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.सर्वसामान्य जनतेला दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांवरील विश्वास उडाला आहे

संबंधित पोस्ट