मोदींची त्सुनामी

मोदींचा जादुई करिश्मा आणि भाजपची संघटनात्मक ताकद याच्या जोरावर भाजपा प्रणित एनडीए आघाडीने केंद्रातील आपली सत्ता कायम राखली. इतकेच नव्हे तर २०१४  पेक्षाही मोठे आणि निर्विवाद बहुमत मिळवले. त्यामुळे आता पुढील ५  वर्षात पंतप्रधान मोदी कोणतेही मनमानी निर्णय घ्यायला मोकळे झाले आहेत. देशाच्या दृष्टीने ही एक खरोखरच चिंताजनक बाब म्हणावी लागेल. मात्र मोदी आणि त्यांच्या या विजयात काँग्रेस सह सगळ्याच विरोधी पक्षांचा सिंहाचा वाटा आहे. कारण नोटबंदी आणि जीएसटी सारख्या काही जनहीत विरोधी निर्णयामुळे मोदी आणि भाजपच्या विरोधात जनतेमध्ये संतापाची भावना असताना ही संतापाची भावना निवडणूक प्रचारात पद्धतशीरपणे कॅश करण्यात विरोधकांना अपयश आले. शिवाय मोदींचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांची जी भक्कम आघाडी उभी राहायला हवी होती ती राहिली नाही. सपा बसपा एक बाजूला, काँग्रेस एका बाजूला, डावे आणि इतर मोदी विरोधक दुसऱ्या बाजूला, अशी विरोधी पक्षांमध्ये फाटाफूट होती. त्याचाच फायदा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी घेतला. त्यामुळे ही निवडणूक अक्षरश एकतर्फी झाली आणि २०१४  प्रमाणेच देशात मोदींच्या भगव्या लाटे ची त्सुनामी आली. मोदींनी या प्रचंड यशाबाबत सर्वात प्रथम विरोधकांचे आभार मानायला हवेत .कारण विरोधकांमधल्या फाटा फुटीनेच मोदींना पुन्हा सत्ता मिळवून दिलेली आहे. अर्थात ते काही असो या प्रचंड यशाबाबत भाजपचे आणि खास करून मोदींचे अभिनंदन करायलाच हवे कारण त्यांनी गेल्या ५  वर्षात काय केले हा जरी संशोधनाचा विषय असला तरी देशाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याचा आणि सुरक्षित ठेवण्याचा जनतेला विश्वास दिला. शिवाय त्यांचे मागील सरकारही बहुमताने असल्याने त्यांनी काही निर्णय झटपट घेतले. त्यामुळे लोकांमध्ये एक विश्वासाची भावना निर्माण झाली. शिवाय आपल्या अमोघ वाणीने लोकांवर प्रभाव टाकण्यात तसेच आपले निर्णय किंवा ध्येयधोरणे लोकांच्या गळी उतरवण्यात मोदी इतके पटाईत आहेत की याबाबत त्यांचा कुणीही हात धरू शकणार नाही. अन्यथा मोदी सोडल्यास भाजपात असा एकही नेता नाही की जो भाजपला एक हाती सत्ता मिळवून देऊ शकतो. पण मोदींनी एकदा नाही तर दोनदा हे करून दाखवले. थोडक्यात वाजपेयी नंतर मोदींच्या रूपाने भाजपला एक चेहरा मिळाला जो धार्मिक कट्टरतावादीही आहे आणि व्यापारीही आहे. परिस्थिती पाहून चेहरा बदलण्याची विलक्षण हातोटी मोदींमध्ये आहे म्हणून तर त्यांनी एक ठराविक टप्प्यावर राम मंदिराच्या मुद्याला हात घातला आणि आम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडलेला नाही हे दाखवून हिंदूंची सहानभूती मिळवली. तर दुसरीकडे पाकिस्तानवर सर्जिकल आणि एअर स्राईक करून आपणच पाकवर कठोर कारवाई करू शकतो याबाबतचा विश्वास जनतेच्या मनात रुजवला. शिवाय महिलांच्या संसाराशी निगडित असलेल्या काही जनहिताच्या योजना राबविल्या त्यामुळे लोक त्यांच्या बाजूला झुकले आणि त्यांना पुन्हा एकदा सत्तेत बसवले. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास महाराष्ट्रातही सेने भाजपला चांगले यश मिळाले.  खास करून वंचित आघाडीचा फॅक्टर त्यांच्या कामी आला कारण या वंचित फॅक्टरने दलित मुस्लिमांची मते खाऊन काँग्रेस राष्ट्रवादीचा मार्ग अवघड केला. अर्थात वंचित आघाडी सत्तेपासून वंचित राहिली हा भाग वेगळा. पण लाखोंच्या सभा घेऊन सत्ता मिळत नसते हे प्रकाश आंबेडकरांना या निवडणुकीने शिकवले आणि वंचितांना न्याय देण्यासाठी निघालेले प्रकाश आंबेडकर स्वतःही सत्तेपासून वंचित राहिले. पवारांच्या घराणेशाहीलाही लोकांनी दणका दिला. थोडक्यात सांगायचे झाल्यास एकजूट आणि नियोजनबद्ध प्रचार केल्यास काय किमया घडवू शकते याचा बोध विरोधकांनी मोदींकडून घ्यावा.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट