विरोधकांचे वरातीमागून घोडे

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकाल येत्या २३  मे रोजी लागणार आहे. पण एक्सिट  पोलच्या सर्व्हेत एनडीए आघाडीलाच बहुमत मिळेल असा दावा करण्यात आल्याने विरोधक धास्तावले आहेत. अर्थात एक्सिट पोलच्या सर्व्हेला ममता सारख्या काही नेत्यांनी केराची टोपली दाखवली हा भाग वेगळा. पण इतर विरोधक मात्र अस्वस्थ झालेत त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा सर्व विरोधकांची मोट बांधण्यासाठी धावपळ सुरू केलीय. त्यासाठी त्यांनी सोनिया गांधीपासून मायावतीपर्यंत आणि शरद पवारांपासून अखिलेश यादव पर्यंत सगळ्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे.  सर्व विरोधकांना एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना कितपत यश येईल हे येणार काळच ठरविलं पण विरोधकांनी आपली विश्वासहर्ता केंव्हाच गमावली आहे, त्यामुळे ते एकत्र जरी आले तरी सत्तेची स्वप्न काही पूर्ण होणार नाहीत. वास्तविक यावेळी विरोधकांना चांगली संधी होती. मोदींच्या विरोधात चांगले मुद्दे होते पण सर्वांनी एकत्र येऊन मोदींचा सामना करण्याची संधी त्यांनी गमावली. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाने महाआघाडी करताना काँग्रेस सारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाला डावलले. भलेही देशात आज काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नसेल पण आजही काँग्रेसची विचारधारा मानणारा एक मोठा वर्ग या देशात आहे. याउलट सपा आणि बसपाने अनेक वर्षे उत्तरप्रदेशात सत्ता उपभोगूनही युपी सोडल्यास देशात त्यांना कुठेही जनाधार नाही. त्यामुळे सपा बसपाची अवस्था प्रादेशिक पक्षासारखीच आहे आणि असे असतानाही त्यांच्या नेत्यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडावीत हा एक मोठा विनोदच म्हणावा लागेल. खरेतर सपा बसपाने स्वतःहून पुढाकार घेऊन सर्व विरोधकांना एकत्र आणायला हवे होते. पण मायावतींचे काँग्रेसविषयी असलेली पोटदुखी आणि अखिलेश यादवची मजबुरी यामुळे विरोधी पक्ष पूर्ण ताकदीनिशी युपी मध्ये एकत्र येऊ शकला नाही. परिणामी विरोधकांचा जो हक्काचा दलित मुस्लिम मतदार आहे त्याची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपलाच झाला आहे. कुठलाही सत्ताधारी कितीही लोकप्रिय असला तरी विरोधकांनी मनापासून ठरवले आणि एकत्र येऊन टक्कर दिली तर सत्ताधाऱ्यांना हरवणे कठीण नाही. १९७७  साली जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाने हे दाखवून दिले. जर इंदिरा गांधींसारख्या ताकदवर महिलेची सत्ता उलथवून टाकणे विरोधकांना शक्य होऊ शकते तर मोदींची सत्ता उलथावणे का नाही शक्य होणार?. पण त्यासाठी विरोधकांनी पूर्ण ताकदीनिशी यापूर्वीच एकत्र यायला हवे होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे आता चंद्राबाबूंच्या धावपळीला काहीही अर्थ नाही जरी विरोधकांची मोट बांधण्याचा चंद्राबाबूंनी प्रयत्न केला तरी ते देशातल्या सर्वसामान्य जनतेपर्यं त पोहचू शकत नाहीत कारण त्यांना हिंदी फारशी समजत नाही.परिणामी आघाडीचा नेता म्हणून ते सार्वजनिक सभांमधून लोकांशी संवाद साधू शकत नाहीत. त्यामुळे  चंद्राबाबूं चे विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न म्हणजे वरातीमागून घोडे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट