नाशिक: हेल्मेट,सीटबेल्ट आदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1 हजार 469 जणांकडून तब्बल 5,80,500 चा दंड

 नाशिक:  पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेत हेल्मेट,सीटबेल्ट आदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या एक हजार चारशे 69 जणांकडून तब्बल 5 लाख 80 हजार 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. आजपर्यंतच्या पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या  मोहिमेत ही मोठी कारवाई ठरली आहे.
विना हेल्मेट 944 वाहनधारकांकडून 4 लाख 72 हजाराचा दंड करण्यात आला. सीटबेल्ट न घातलेल्या  14 जणांकडून 18 हजार 400 रूपये दंड आकारण्यात आला. विना गणवेश रिक्षा, टॅक्सी 25 चालकांकडून 5 हजार रूपये,वाहतुकीस अडथळा  प्रकरणी एकाकडून 200 रूपये,कागदपत्रे न बाळगल्याप्रकरणी 75 जणांकडून 15 हजार रूपये, विना परवाना 9 जणांकडून 4 हजार 500 रूपये, बिल्ला नसलेल्या एकाकडून 200 रूपये, 15 दिवसाच्या मुदतीत कागदपत्र सादर न करणार्‍याकडून 200 रूपये, परवाना दाखवू न शकणार्‍या 153 जणांकडून 30 हजार 600 रूपये, नियमाप्रमाणे नंबर प्लेट नसलेल्या कडून हजार रूपये,सिग्नल  मोडणार्‍या तिघांकडून 600 रूपये, क्षमतेपेक्षा अधिक सामान भरल्या  प्रकरणी दोघांकडून 400 रूपये, वाहतूक नियम न पाळणार्‍या 42 जणांकडून 8 हजार 400 रूपये,मुख्य रस्त्यावर वाहने उभे करणार्‍या दोघांकडून 400 रूपये,विना पार्किंग वाहने उभे केल्या प्रकरणी 200 रूपये,भररस्त्यात धोकादायक स्थितीत वाहने उभे करणार्‍या तिघांकडून 600 रूपये,प्रतिबंधीत क्षेत्रात वाहने उभी करणार्‍या 64 जणांकडून 12 हजार 800 रूपये,क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणार्‍या 3 जणांंकडून 600 रूपये,पाोलिसांच्या सुचनांचे उल्लंघन करणार्‍या 9 जणांकडून 1हजार 800 रूपये,रिक्षाची उजवी बाजू बंदिस्त न करण्या प्रकरणी 6 जणांकडून 1हजार 200 रूपये,वाहनतळ सोडून अन्य ठिकाणी वाहने उभी करणार्‍या दोघांकडून  400 रूपये,ट्रिपलसीट 11 जणांकडून  2 हजार 200 रूपये, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणार्‍या 4 जणांकडून 800 रूपये, भरवाहतुकीत यु टर्न घेणार्‍यांकडून 200 रूपये वसूल करण्यात आले.


 वाहनचालक हेल्मेट घालूनच घराबाहेर
 पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार शहर, परिसरात काल सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत हेल्मेट-सीटबेल्ट सक्ती तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. बहुतेक नागरिकांनी दंडाच्या भितीपोटी का होईना परंतु हेल्मेट घालणे पसंत केले. या मोहिमेचे नाशिककरांकडून स्वागत करण्यात आले. मोहीम व मोहिमेचे पॉइंट’ सोशलमिडिया तसेच सकाळी वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेत हेल्मेट परिधान करून उंबरा ओलांडणे पसंत केले. हेल्मेट परिधान करून वाहन चालविणार्‍या नागरिकांना  स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गुलाबपुष्प, तुळसचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. ज्यांनी हेल्मेटकडे दुर्लक्ष केले त्यांच्याकडून 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.यावेळी वाहनचालक व पोलीस यांच्यात काही ठिकाणी कुरबुरीही झाल्या.
हेल्मेट न घातल्याने व सीटबेल्ट न लावल्याने दिवसाआड एक मृत्यू होत असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली होती. सर्व पोलीस ठाणे हद्दीतील 30 पॉइंटवर संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी व वाहतूक पोलीसांनी संयुक्तरित्या कारवाई केली.काही दुचाकीस्वार महिला-पुरूष मोपेड दुचाकीच्या डिक्कीत हेल्मेट ठेवून दुचाकी चालवितानाही पोलिसांना आढळून आले. यावेळी अशा वाहनचालकांना अडवून पोलीसांनी प्रबोधन करत हेल्मेट घालण्यास भाग पाडले व दंड माफ करून समज दिली. शहरात पोलिसांनी हेल्मेटविना प्रवास करणा-याविंरूध्द दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली. महाविद्यालयीन युवक-युवतीपासून दुधवाल्यापर्यंत सर्वच नाशिककरांनी मोठ्या संख्येने हेल्मेट वापरण्यावर भर दिल्याचे दिसून आले. यामुळे शहरातील प्रत्येक सिग्नलवर महिला, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक दुचाकीस्वार हेल्मेटमध्ये पहावयास मिळाले.

पोलीस काँस्टेबल जखमी
काल सकाळी साडेबारा वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस ठाण्याचे पो. काँ कासार कर्तव्य बजाऊन मोटारसायकलने घरी जात असताना  एका मोटर सायकल स्वाराने राँग साईटने येऊन त्यांना धडक दिली. या अपघातात कासार यांच्या  डाव्या खांद्याचे हाड फ्रँक्चर झाले असून त्यांना सुयश हाँस्पीटलमध्ये अँडमिट केले आहे. सुदैवाने दोघांनिही हेल्मेट घातल्या मुळे त्याच्यां डोक्याला मार लागला नाही. या बाबत पुढील कारवाई सुरू आहे.

दंडासाठी गयावया
हेल्मेट सक्ती असतांना हेल्मेट परिधान करून न आलेल्या वाहनचालकांना ठिकठिकाणच्या नाक्यावर अडविण्यात आले.त्यांच्याकडे 500 रूपये दंडाची मागणी करताच, ड्युटीला जायचे आहे,घाईगर्दीत आल्यामुळे हेल्मेट विसरलो, मान दुखती, उद्यापासून असे होणार नाही,अशी गयावया वाहनचालक करतांना दिसत होते.500 रूपयाचा दंड ऐकुण मुंबई नाक्यावर एका महिलेने तर टाहोच फोडला.

संबंधित पोस्ट