नाशिक: धनदांडग्यांची कर्जवसूली टाळण्यासाठी जिल्हा बँक कर्मचार्‍यांना भूतबाधा

धनदांडग्यांची कर्ज वसुलीचा मुद्दा कळ मारीत असतांना जिल्हा बँक डबघाईला येण्याचे कारण म्हणजे द्वारकेवरील कब्रस्थानाची जागाच असा दावा संचालक मंडळासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी केला . ही ’भूतबाधा’ उतरण्यासाठी बँकेचे मुख्यालय पुन्हा नव्या इमारतीतून सीबीएसजवळील जुन्या इमारतीत स्थलांतरित करण्याची तयारी सुरू झाली आहे. यामुळे बँक उर्जीत अवस्थेत येणार का? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.
डिजीटल इंडियाचे स्वप्न पडत असतांना जिल्हा बँकेसारख्या महत्त्वाच्या संस्थेत अंधश्रद्धा पाळल्या जात असल्याने त्याची वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.अल्प पर्जन्यमान,सतत कोसळणारे बाजारभाव यातून आलेला कर्जबाजरीपणा या संकटांचा सामना करीत असलेला जिल्ह्यातील बळीराजा बँकेच्या वसुलीने त्रस्त झाला आहे. धनदांडग्यांच्या वसुलीकडील लक्ष विचलीत करण्यासाठी भूतबाधेने डोके वर  काढले नाही ना? अशी चर्चा आता जिल्हा बँक वर्तुळात रंगली आहे.याला कारणही तसेच ठरले.अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर बँकेच्या  जुन्या इमारतीत तिजोरीसह सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. आता म्हणे टप्प्या-टप्प्याने अन्य विभाग या इमारतीत स्थलांतरीत करण्याची तयारी संचालक मंडळाने केली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही आणि तिजोर्‍यांच्या खरेदीसाठी भुताटकीचा संदर्भ दिल्याने वादात सापडलेली जिल्हा बँक या नव्या अंधश्रद्धेपायी तब्बल पाच कोटी रुपयांवर पाणी सोडणार आहे. भाजपच्या ताब्यातील बँकेच्या आर्थिक भरभराटीचा संबंध थेट अंधश्रद्धेशी जोडण्यात आल्याने नव्या वादालाही तोंड फुटले आहे.ही बँक जिल्ह्यातील शेतकर्‍यांची अर्थवाहिनी ठरली आहे. जिल्हा बँकेचे  2700 कोटींचे कर्ज थकीत असून, कर्जवसुली मात्र अवघी पाच ते दहा टक्के आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात बँकेने कर्जवसुलीचा तगादा सुरू केला आहे. यातूनच चिंतेत असलेल्या संचालक मंडळासह अधिकारी कर्मचार्‍यांना यावर जालीम उपाय सापडला आहे. या आर्थिक अरिष्टाचा संदर्भ त्यांनी थेट अंधश्रद्धेशी जोडला आहे. जिल्हा बँकेचे मुख्यालय पूर्वी सीबीएसजवळील जुन्या इमारतीत होते.2007 मध्ये या इमारतीतून जिल्हा बँकेचे मुख्यालय हे द्वारका भागातील नव्याने पाच कोटी खर्चून बांधलेल्या इमारतीत करण्यात आले होते. तत्कालिन अध्यक्ष माणिकराव कोकाटेंच्या कार्यकाळात सदरची इमारत उभारण्यात आली होती. गाजावाजा करून त्याचे स्थलांतरही करण्यात आले. परंतु, हे स्थलांतर झाल्यापासून बँकेला अवकळा आल्याचा समज वाढू लागला. द्वारकेवरील नव्या इमारतीची जागा कब्रस्थानच्या मालकीची होती. या ठिकाणी प्रेतांचे दफनविधी होत असत असे सांगितले जात होते. परंतु, बँकेने सन 2002 मध्ये ही जागा एका ट्रस्ट्रकडून जप्त केली होती. त्यामुळे आता ही जागा शापित असल्याचे सांगत तिला भुताकटीने पछाडलेले असल्याचा समज येथे कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा झाला आहे. बँकेच्या नव्या इमारतीतील स्थलांतरानंतरच बँक आर्थिक डबघाईस आल्याची मानसिकता झाली असून, अधिकारी व कर्मचार्‍यांनी सदरची बाब संचालक मंडळाच्या गळी उतरवली आहे. बँक कधी नोकरभरती, कधी सीसीटीव्ही, तिजोरी खरेदीसह कर्जवाटपातील भ्रष्टाचारामुळे चर्चेत राहीली. नवीन इमारत ही कब्रस्तानच्या जागेवर उभी असून बँक स्थलांतरीत झाल्यापासूनच आर्थिक तोट्यात जात असल्याची मानसिकता अधिकारी व कर्मचार्‍यांची आहे. बँकेला आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याची आमची तयारी आहे. या जागेवर काम करण्याची कर्मचार्‍यांची मानसिकता नसल्याने बँक स्थलांतराचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

संबंधित पोस्ट