नाशिक उत्पादन शुल्क विभाग वार्षिक महसूल वसूलीत नंबर वन : २६४२ कोटी ७५ लाखाची वसूली -राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी

नाशिकचा राज्य उत्पादन शुल्क विभाग महसूल वसूलीत नेहमीच आघाडीवर राहिला आहे. २०१८ -१९ मध्ये या विभागाने तब्बल २६४२ कोटी ७५  लाख रूपयांची वसूली केली आहे.गत वर्षाच्या तूलनेत ७०७  कोटी २३  लाख रूपयांची वाढ करून ३६ .५३  टक्के अधिक वसूली केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागिय उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांनी दैनिक आदर्श महाराष्ट्रशी बोलतांना दिली.
या विभागाने २०१७ -१८  मध्ये १९३५  कोटी ५२  लाख रूपयांची महसूल वसुली केली होती.देशी मद्य ३१८ .४५  लाख बल्क लिटर,विदेशी मद्य १३८ .७७  लाख बल्क लिटर, बियर १७६ .५४  लाख बल्क लिटर तर वाईन ६.२१  कोटी बल्क लिटर विक्री झाली. या विक्रीतून १९३५  कोटी ५२  लाख रूपयांचा महसूल मिळाला होता. या वर्षी त्यात ३६.५३  टक्के वाढ झाली आहे.राज्यात वार्षिक वसूलीत नाशिक विभाग नंबर वन ठरला आहे.
महसूल वाढविण्या बरोबरच या विभागाने अवैधरित्या धंदे करणार्‍या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी धडक मोहीम राबवून ठिकठिकाणी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विभागातर्फे २०१८ -१९ मध्ये ठिकठिकाणी ५ हजार ५४३ गुन्हे  दाखल करण्यात आले.त्यात 3 हजार ३५० गुन्हे वारस असून २१९३ गुन्हे बेवारस आहेत. त्यात ३ हजार ३३७ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तर १४ कोटी १६ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात विभागाला यश आले आहे.गत वर्षाच्या तुलनेत या वर्षात ७१९ आरोपी अधिक सापडले आहेत. ३ कोटी ७ लाख रूपयांचा अधिक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागासमोरील धोके
दमण, सिल्वासा,मध्यप्रदेशमार्गे हरियाणा पंजाबची दारू मोठ्या प्रमाणात येत होती. या दारूमुळे महसूल बुडत होता. या सिमा लगत भागाकडे लक्ष वेधले असता या ठिकाणावरून येणार्‍या मद्यावर  नियंत्रण आले आहे. विभागात शासनाने मंजूर केलेले ४ तपासणी नाके असून पदे मंजूर नसलेले ४ असे एकुण ८ तपासणी नाक्यामार्फेत तपासणीचे काम करण्यात येते. धुळे,जळगाव,नंंदुरबार व नाशिक या ठिकाणी तपासणी नाके कार्यरत आहेत. अवैध मद्याची तस्करी करणार्‍यावर नियंत्रण मिळविण्यासाठी धुळे १ , जळगाव १ ,नंदुरबार १  तर नाशिकला ३ भरारी पथके असून या पथकांमार्फेत अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारी वाहने पकडण्यात येतात.
ठिकठिकाणी अवैधरित्या दारूची निर्मिती तसेच वाहतूक करण्याची माहिती मिळताच भरारी पथकांमार्फेत अवैधरित्या मद्याची वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात येतात.तसेच मद्यनिर्मितीचे ठिकाण नष्ट करण्यात येवून तेथील साहित्य जप्त करण्यात येते. वर्षभरात ठिकठिकाणाहून ८ सायकली, १३५ दुचाकी, ७५ कार, जीप तर १३ ट्रक व टेम्पो असे एकूण २३३ वाहने जप्त करण्यात आले आहेत.अवैधरित्या मद्याची निर्मिती व व्यापार करणार्‍या सराईत गुन्हेगारांना पकण्यावरच आमची नजर असल्याचे प्रसाद सुर्वे म्हणाले.

संबंधित पोस्ट