इगतपुरी : धरणाच्या तालुक्यातच पाणी टंचाई

नाशिक : इगतपुरी तालुका धरणाचा, पावसाचे माहेरघर आणि प्रचंड पर्जन्याचा अशी इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. या वर्षात मात्र तालुक्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाईला आदिवासी महिलांना सामोरे जावे लागत असुन हंडाभर पाण्यासाठी चक्क विहिरीत उतरुन पाणी भरावे लागत असल्याने प्रशासनावर व लोकप्रतिनिधीवर नागरिकांनी संताप व्यक्त करीत आहे. तालुक्यात धरणे बांधण्यासाठी हजारो शेतकर्‍यानी जमिनी दिल्या.बदल्यात पाण्याचे आरक्षण देऊ असे आश्‍वासन दिले. मात्र स्थानिक शेतकरी व भुमीपुत्र, धरण प्रकल्पग्रस्त यांना प्रथम पाणी पुरवण्याचे सोडुन शासन जायकवाडीला पाणी सोडत असल्याने स्थानीकांवर अन्याय झाला आहे.
तालुक्यातील गावागावांत दरवर्षी पाचवीला पुजलेली पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची झळ यावर्षी बसू लागली आहे. तालुक्यातील आवळखेड, मायदरा, धानोशी, आंबेवाडी, टिटोली या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.तर 3 गावांत टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. दरवर्षी तालुक्यातील किमान दहा ते पंधरा गावांना दरवर्षी टँकर सुरू करावा लागतो. ह्यावर्षी संख्येत वाढ होईल अशी शक्यता आहे.  इगतपुरी नगरपालिका हद्दीत आठवड्यातून फक्त 2 वेळा पाणी देण्यात येत आहे. घोटी शहरातील मंजूर असलेल्या 19 कोटींच्या पाणी योजनेसाठी पाटबंधारे विभागाची अनास्था पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहे.तालुक्यात सर्वाधिक साडे तीन हजार ते चार हजार मिली पावसाची नोंद होते. असे असूनही तालुक्याच्या पाचवीलाच पाणीटंचाई पुजलेली आहे.इगतपुरी तालुक्यात झालेल्या चुकीच्या पाणी योजना, ग्रामपंचायतींमधील बिकट राजकारण, भ्रष्ट कारभार आणि नियोजनाचा अभाव, स्थानिक लोकप्रतिनिधींची चुप्पी अशा अनेक कारणांमुळे ग्रामीण जनतेला तृषार्त राहावे लागत आहे.तालुक्यात 94 ग्रामपंचायती आणि 131 महसुली गावे आहेत. अनेक गावांत विविध पाणी पुरवठ्याच्या योजना कागदोपत्री आकाराला आलेल्या दिसून आलेल्या आहे.

संबंधित पोस्ट