सक्तीची कर्जवसुली मोहीम राबवून जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम - समीर भुजबळ

नाशिक: गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांवरील सक्तीची कर्जवसुली मोहीम आणि जमिनीचे लिलाव थांबविण्याची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची सक्तीची कर्ज थांबविण्याची मागणी आहे.त्यामुळे याबाबत आर्मस्ट्राँगचा संदर्भ जोडून विपर्यास करू नये असे माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की,नाशिक जिल्हा मध्यवर्ती सह बँकेकडून गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर जप्तीची केली जात असलेली कारवाई ही चूकीची असल्याने छगन भुजबळ यांनी त्याविरोधात आवाज उठवला.मात्र याबाबत आर्मस्ट्राँग साखर कारखान्याचा संदर्भ जोडण्यात आला.
खरतर जिल्हा बँकेने कारखान्याला दुसऱ्या वर्षी कर्ज दिले असते तर कारखाना सुरळीत चालू राहिला असता आणि आम्ही नियमितपणे कर्जही फेडू शकलो असतो.सक्त वसुली संचालनालयाने हा कारखाना अटॅच केलेला आहे. त्यांच्याकडून कारखाना ताब्यात घेण्यासाठी जिल्हा बँकेने यापूर्वीच विशेष ईडी न्यायालयात अर्जही केलेला आहे, याबाबत जी न्यायालयीन लढाई आहे ती आम्ही लढू.मात्र दुष्काळामुळे गरीब शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई करू नये अशी छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची मागणी आहे.
राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांकडील कर्जवसुलीला स्थिगिती दिलेली असतांना नाशिक जिल्हा बँकेकडून सक्तीची कर्जवसुली मोहीम राबवून शासनाचे आदेश धुडकावून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे हे चुकीचे आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याने गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांवरील सक्तीची कर्जवसुली मोहीम आणि जमिनीचे लिलाव थांबविण्याची  छगन भुजबळ साहेब यांची मागणी आहे.
एकीकडे खरीप हंगाम दीड महिन्यावर येऊन ठेपला असताना त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याऐवजी जिल्हा बँकेकडून सक्तीची कर्जवसुली मोहीम राबविली जात आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीशी सामना करत असलेला शेतकरी कर्जबाजारी झाला असून कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहे. यासाठी सरकारने कर्जवसुली करू नये असे आदेश दिले असतांना जिल्हा बँकेकडून सरकारचे आदेश धुडकावून लावत सक्तीची कर्जवसुली मोहीम राबवून शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम जिल्हा बँकेकडून केली जात असल्याची टीका समीर भुजबळ यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट