महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस, मनपा आयुक्त मतदानाचा हक्क बजावतांना आघाडीवर

नाशिक। वार्ताहर।लोकसभा निवडणुकीतील मतदानासाठी शहरातील मतदारांत मोठा उत्साह पहावयास मिळाला. सकाळी साडेसहा वाजेपासून मतदान केंद्रांवर नागरिक येत होते. शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे या सर्वच प्रशासनप्रमुखांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी भासल्यास थेट जवळच्या पोलीस ठाणे अथवा नियंत्रण कक्षासोबत त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, तक्रारींची तत्काळ दखल घेतली जाणार असल्याचेही प्रशासनप्रमुखांनी स्पष्ट केले असल्यामुळे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव नागरिकांनी साजरा केला. 

शहरात मोठ्या प्रमाणावर मतदारांचा उत्साह पहावयास मिळाला.  सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांनी सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत गर्दी केली होती. उन्हाचा चटका वाढू लागल्याने दुपारी साडेबारा वाजेनंतर गर्दी काही प्रमाणात ओसरल्याचे चित्र पहावयास मिळाले.मात्र चार वाजेनंतर पुन्हा गर्दी वाढू लागली.
 कायदा सुव्यवस्थेची मुख्य जबाबदारी असलेले  पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील तसेच जिल्हा प्रशासनप्रमुख या नात्याने संपुर्ण निवडणूकीची तयारीची व्यवस्था सज्ज ठेवण्यापासूनची तयारीची जबाबदारी पार पाडणारे सुरज मांढरे यांनीही आपले कर्तव्य बजावले. महापौर रंजना भानसी यांनीही शहराचे प्रथम नागरिक या नात्याने मतदानाचा हक्क बजावला. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही मतदानाला प्राधान्य दिले. धर्मगुरू स्वामी संविदानंद सरस्वती, शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, नायब काजी सय्यद एजाज, नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.सर्वसामान्य नागरीक मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावत होते. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन सुरू असल्याने मतदारां भोवती पिंगा घालणारे उमेदवारांचे कार्यकर्ते यावेळी फारसे दिसून आले नाही. गुप्त प्रचार सुरू असला तरी उघडपणे प्रचार बुथच्या ठिकाणीच पहावयास मिळाला. मात्र मतदानासाठी मतदारात जागृती निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले.

संबंधित पोस्ट