सुरगाणा तालुक्यात 6 जणांना अतिसारची लागण

नाशिक: दुषित पाण्यामुळे  अतिसाराचा उद्रेक होवून सहा जणांचा लागण झाल्याने सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत अंबोडा, झगडेपाडा  येथे  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांच्या सूचनेनुसार त्वरित पाणी व स्वच्छता कक्षातील चमूने व अंबोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी पथकाने भेट देवून याबाबत माहिती घेतली. 

सुरगाणा तालुक्यातील झगडेपाडा येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे पाणी दुषित होवून अतिरासाराची लागण झाली होती. याबाबत डॉ, गिते यांनी वेळीच उपाययोजना करण्याचे आदेश दिले त्यानुसार पाणी व स्वच्छता कक्षातील चमूने व अंबोडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी पथकाने पाणी शुद्धीकरणाचा आढावा घेत सर्व संबधित यंत्रणानी जबाबदारीने काम करणेबाबत सूचना दिल्या, यावेळी विहिरीची पाहणी करण्यात आली. अंबोडा येथील ग्रामीण रुग्णालय बाऱ्हे येथे भेट दिली असता असलेले आंतररुग्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सद्यस्थितीत एकही गंभीर रुग्ण नसल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.

 ग्रामपंचायत अंबोडा, झगडेपाडा येथील ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांची बैठक घेण्यात येऊन त्यांना सद्यस्थितीत विहिरीचे पाणी पिण्यास न वापरण्याबाबत परंतु पाड्यावरील उपलब्ध हातपंपाचे पाणी पिण्यास वापरणेबाबत, तसेच पिण्याच्या पाण्यात जीवन डॉप चा वापर करणेबाबत, पाणी उकळून व गाळून पिणेबाबत सूचना देण्यात आल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशादिन शेळकंदे यांनी सांगितले. यावेळी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत, जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी व पथक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, उप. पाणी गुणवत्ता सल्लागार, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट