कष्टक-यांचा दिपस्तंभ - मा . श्री . गुलाबरावजी जगतापसाहेब

        "साहेब" या तीन अक्षरामध्ये माझ्यासारख्या असंख्य तळागाळातील केवळ माथाडीचं नाही , तर इतर सर्वच क्षेत्रातील सर्वसामान्य कामगारांचे , कार्यकर्त्यांचे सर्वस्व असणारे माथाडी कामगारांचे पोलादी नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या माथाडी कामगार नेते माननीय गुलाबरावजी जगताप साहेब हे आपल्या वयाची एकसष्ठी पुर्ण करीत आहेत. त्यांच्या एकसष्ठ वर्षाच्या आयुष्यातील जवळपास तीस वर्षाच्या कालखंडाच्या कारकिर्दीचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले आहे, ही बाब माझ्यासाठी अनमोल असा ठेवा आहे. साहेबांच्या एकसष्ठीच्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याइतका मी मोठाही नाही आणि तेवढा माझा अवाकाही नाही. मात्र साहेबांच्या सावलीत वावरताना साहेबांनी प्रामुख्याने कामगार, सहकार, सांस्कृतिक, आरोग्य, क्रिडा, व्यसनमुक्ती या क्षेत्रात केलेल्या कामाचा नुसता विचार जरी केला तरी त्यातुन साहेबांचे उत्तुंग व्यक्तिमत्व अधोरेखीत होते . ऐन तारुण्यात सातारा जिल्ह्यातील, लिंब गावातील स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा असणाऱ्या राष्ट्रप्रेमी कुटुंबातून पोटा पाण्यासाठी मुंबईमध्ये आलेल्या या युवकाने ‘ माथाडी कामगार म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली . अंगभूत नेतृत्व गुण असणाऱ्या साहेबांनी परिश्रमाच्या बळावर दिवसभर ‘ माथाडी कामगार ' म्हणून काम करत असताना रात्रशाळेमध्ये शिक्षण घेऊन उच्चविद्याविभूषित होण्याचा बहुमान प्राप्त केला . माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्व. आण्णासाहेब पाटील यांनी मा. जगताप साहेबांमधील नेतृत्व गुण हेरुन त्यांना आपल्या संघटनेमध्ये सामावून घेतले स्व.आण्णासाहेब पाटील यांचे मार्गदर्शन व स्वतः माथाडी कामगार म्हणून काम केल्याने कामगारांच्या प्रश्नांची नेमकी जाणीव असणाऱ्या साहेबांनी अल्पावधीतच कामगारांच्या मध्ये आपुलकीचे स्थान मिळवले ते स्थान दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेले . माथाडी संघटनेत साहेब आज सर्वोच्च अशा कार्याध्यक्ष पदी विराजमान आहेत . महाराष्ट्र राज्यातील बलाढ्य अशा कामगार संघटनेचे नेतृत्व करत असताना, स्व. आण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या कष्टक-यांच्या जीवनात सुवर्णयुग आणणाऱ्या कामगार चळवळीचा हा 'जगन्नाथाचा रथ' स्व. काशिनाथ वळवईकर, स्व. शिवाजीराव पाटील साहेब, स्व. संभाजीराव पाटील साहेब व सध्या मा .शशिकांतजी शिंदे साहेब व श्री. नरेंद्र पाटील साहेब यांच्या सोबतीने पुढे नेण्याचे काम मा. जगताप साहेब करित आहेत. माथाडी संघटनेच्या माध्यमातुन साहेबांनी कष्टकरी कामगारांना न्याय देण्याबरोबरच त्यांच्या निवा-याचाही प्रश्न तितक्याच ताकदीने सोडविला आहे. शासन दरबारी आपली भूमिका संयमाने मांडून कामगारांच्या प्रश्नांची निकड शासनाच्या लक्षात आणून देऊन, नवी मुंबई क्षेत्रात माथाडी कामगारांना अत्यल्प परवडणाच्या किंमतीत घरे उपलब्ध करुन देण्याचे काम माननीय जगताप साहेबांनी केले आहे . विविध माथाडी बोर्डवर शासननियुक्त कामगार प्रतिनिधी म्हणून काम करतान मा. जगताप साहेबांनी आपल्या अभ्यासपूर्ण कौशल्याच्या जोरावर कामगार हिताला प्राधान्य देत अनेक जटील अशा प्रश्नांची उकल करुन , मालक देखील कामगारांच्या प्रती त्यांचे उत्तरदायित्व स्वखुशीने मान्य करतील अशा रितीने कामगार व मालक यांच्यामध्ये समन्वय साधून उभय पक्षांच्या प्रश्नाची यशस्वीरित्या सोडवणूक केली आहे . त्यामुळे कामगार व मालक या दोघांनी देखील जगताप साहेबांच्या नेतृत्व गुणाची कदर करत 'मुंबई प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समिती‘च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करुन त्याच कार्याला पोचपावती दिली आहे . गेली १० वर्ष मा. जगताप साहेब मुंबई प्रदेश लोखंड व बाजार समितीच्या अध्यक्ष या नात्याने कळंबोली येथील विस्तिर्ण अशा लोखंड व पोलाद यार्ड मधील रस्ते, पाणीपुरपठा, शौचालय यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करुन प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न करीत आहेत . यार्डमधील काही रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पुर्णत्वास गेले आहे. शौचालयांचेही काम चालू आहे . मा. जगताप साहेबांच्या अध्यक्षतेखाली बाजारसमिती मार्फत उर्वरीत कामे देखील येणा-या कालावधीत मार्गी लागतील अशी आमच्या कामगारांची खात्री आहे .
         मा. जगताप साहेबांची कामगार क्षेत्रामध्ये घोडदौड सुरु असताना सन १९९४-९५ च्या दरम्यान ' दि . हिंदुस्थान को - ऑपरेटीव्ह बँक लि.' या माथाडी कामगारांच्या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये बँकेच्या सभासदांच्या व आम्हा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर साहेबांना भाग घेण्यास प्रवृत्त केले गेले . रौप्यमहोत्सवी वर्षात झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणूकीमध्ये मा.जगताप साहेब व त्यांचे सहकारी प्रचंड बहुमताने निवडून आले व सर्व संमतीने बँकेच्या अध्यक्षपदी मा. जगताप साहेब विराजमान झाले, त्याच क्षणापासून माथाडी कामगारांनी १९७० साली स्थापन केलेल्या ' दि . हिंदुस्थान को-ऑपरेटीव्ह बँक लि' च्या विकास पर्वास सुरुवात झाली . मा . जगताप साहेबांनी बँकेची धुरा हाती घेतली तेव्हा बँकेच्या आपल्या कुशल अभ्यासाच्या जोरावर सर्वसामान्य माथाडी कामगार सोबतीस घेऊन आज अखेर २६ शाखा ९०० कोटींच्या वर ठेवी व ५५० कोटीची कर्ज मिळून १५०० कोटीच्यावर मित्र व्यवसाय करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य ‘ नागरी सहकारी बँक अशी एक ख्याती या बँकेस मिळवून दिली आहे . आज बँकच्या संचालक म्हणून साहेबांच्या सोबत काम करण्याचा बहुमान मला मिळाला आहे हे माझे भाग्य समजतो . दि . हिंदुस्थान को-ऑपरेटीव्ह बँके बरोबरच, आण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी तसेच ग्राहक सोसासटी या दोन संस्थांमध्ये देखील मा. जगताप साहेबांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे . साहेबांच्या सहकार क्षेत्रातील कामाची दखल घेऊन दि. बृहन्मुंबई नागरी सहकारी बँके असोशिएशन यांनी मा . जगताप साहेबांना, असोशिएशन संचालकपदी बिनविरोध निवड करुन ' उपाध्यक्ष' पदाचा बहुमान दिलेला आहे . बँकेच्या माध्यमातून अनेक होतकरु, गरजूंना आवश्यक त्या कर्जसुविधा उपलब्ध करुन देऊन अनेक लघुउद्योजक , उद्योजक तयार करण्याचे काम मा. जगताप साहेबांनी केले आहे. घरकर्जाच्या माध्यमातून अनेक गरजूंना घरे उपलब्ध करुन दिली आहेत. शैक्षणिक कर्ज योजनांद्वारे अनेक विद्यार्थाना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास पैशा अभावी अडथळा येऊ नये याची काळजी घेतली आहे. रिक्षा , टॅक्सी अशासारख्या वाहन खरेदीस कर्ज देऊन हजारोंना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे. हे करीत असताना माथाडी कामगारांनी स्थापन केलेल्या बँकेमध्ये कामगारांच्याच गरजू होतकरु व शिक्षित मुलांना नोकरी देऊन त्यांच्या उदर निर्वाहाची सोय केली आहे.  मा. जगताप साहेबांच्या २७ डिसेंबर ही जन्मतारिख बरीच वर्ष आम्हा कार्यकर्त्यांना माहित नव्हती मुलुंड यार्ड मधील काही कामगार व कार्यकर्ते व आम्ही इतर लोखंडबाजारातील कार्यकर्त्यांनी साहेबांकडे वारंवार पाठपुरावा करुनही वाढदिवसास मान्यता देत नाहीत हे पाहून अचानक डोंबिवली येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा प्रघात सुरु केला सलग २-३ वर्ष हा प्रकार पाहून साहेबांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन अखेर त्या वर्षी २७ डिसेंबर १९५७ ही आपली जन्मतारीख असल्याचे सांगितले . त्यावर्षी कामगारांनी अतिशय उत्साहात साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचा बेत आखला. साहेबांच्या अपरोक्ष वाढदिवस करण्याचा निर्णय आम्ही कार्यकर्त्यांनी घेतला याचे कारण साहेब त्यास परवानगी देणार नाहीत याची आम्हाला खात्री होती पण साहेबांना त्याची कुणकुण लागली . मात्र सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह व आग्रह बघून साहेबांने नाईलाजाने परवानगी दिली मात्र आम्हास सूचना दिल्या की,  वाढदिवसाचे स्वरुप उत्सवी न राहता त्याद्वारे सामाजिक बांधीलकी जोपासणारे काम करता आले तर आपल्या संघटीत श्रमशक्तीचा समाजासाठी निश्चितसा उपयोग होईल आणि त्याचे प्रेरणेतून साहेबांनी रक्तदान शिबिरासारख्या एका पवित्र अशा कामाची मुहर्तमेढ रोवली गेली . दरवर्षी मा.जगताप साहेबांच्या वाढदिवशी जमा होणारे शेकडो  बाटल्या रक्त समाजातील गरजूपर्यँत पोहोचवण्याचे काम केले जाते . रक्तदान शिबिराबरोबरच कामगारांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाते. त्याचबरोबर उपस्थितांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम त्यादिवशी आयोजित केले जातात.
        मा .जगताप साहेबांच्या या नेतृत्व गुणास सातत्याने साथ देणाऱ्या त्याच्या सुविद्य पत्नी डॉ . सौ . मंजुषाताई जगताप म्हणजे तमाम माथाडी कामगारांच्या लाडक्या वहिनीसाहेब यांचीही तोलामोलाची तेवढीच साथ आहे . घर , प्रपंच, मुलांची शिक्षण, सासु-सास-यांची शुश्रूषा, नातेवाईकांचे यथोचित मानपान तसेच साहेबांना दररोज सकाळी ६ वाजल्यापासून भेटायला येणाच्या कामगारांचे आगत - स्वागत , चहापानाची चोख व्यवस्था स्वतः करीत असतात . या सर्व व्यस्त वेळापत्रकामधून आपल्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधून अत्यंत परिश्रमाने 'वास्तुशास्त्रा' सारख्या अत्यंत जटील परंतु अत्यंत दुर्लक्षित क्षेत्रामध्ये संशोधन करुन डॉक्टरेट मिळवली आहे . मा. जगताप साहेबांची विनयशील असणारी दोन्ही मुलं उच्चविभूषित आहेत . चि . मोहित वैमानिकाचे प्रशिक्षण घेत असून मुलगी कु. युगंधा वैद्यकिय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेण्याकरिता परदेशात आहे. अशा या परिवाराचा एका घटक होण्याचे भाग्य माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला लाभले आहे हे माझे भाग्य समजतो .  
       मा . जगताप साहेबांच्या एकसष्ठी निमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करताना परमेश्वराजवळ एकच मागणे मागतो, देवा आमचे आयुष्य साहेबांना दे आणि त्यांना शतायुषी कर. त्यांच्या द्वारे उत्तरोत्तर अशीच कष्टक-यांची वंचितांची सेवा घडो. हि प्रार्थना .

Writer

  • संपतराव गोडसे

    उपाध्यक्ष : महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार युनियन (रजि.),
        संचालक : दि. हिंदुस्थान को-ऑप. बँक लि.,मुंबई